नागपूर : कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. ज्याला कोरोना होत आहे, तो आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड तणावात जगात आहे. मात्र, नागपुरातील एका कुटुंबाने अनेक अडचणी असताना आणि कुटुंबातील वृद्ध आई वडिलांना अनेक रोग जडलेले असताना खोडे कुटुंबियांनी आगळ्यावेगळ्या सकारात्मकतेने कोरोनावर मात केली आहे. शेतकरी असलेले पुरुषोत्तम खोडे, शिक्षिका असलेली मीना खोडे आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली त्यांची लेक रेणुका खोडे. या तिघांनी चित्रकारीच्या माध्यमातून स्वतःमध्ये कमालीची सकारात्मकता निर्माण केली आणि कोरोनाला पराभूत केले आणि ते ही कोणत्याही रुग्णालयात दाखल न होता.


नागपूरच्या भाग्यश्री नगरातील खोडे कुटुंबाच्या घराच्या वेगवेगळ्या भिंतीवर आकर्षक आणि चटक रंगाच्या अनेक पेंटिंग्स साकारलेल्या आहेत. कुठे रौद्र रूपातील शंकर आणि नागराज. कुठे संपूर्ण भिंत व्यापलेल्या उलूकराजची (उल्लूची) भव्य पेंटिंग. कुठे विंग्स ऑफ फायर दर्शविणारे पक्ष्यांचे पंख. कुठे गवत खाताना झेब्रा. तर कुठे राष्ट्रीय पक्षी मोरची सुंदर आकृती. खोडे कुटुंबियांचा संपूर्ण घर सध्या अशाच आकर्षक पेंटिंग्सनी सजलेलं आहे. आणि या सर्व पेंटिंग खोडे कुटुंबातील लेक रेणुकाने तिच्या आई वडिलांच्या मदतीने ते सर्व कोरोना ग्रस्त असताना काढल्या आहेत.



रेणुका व्यवसायिक चित्रकार नाही. कधी तरी कागदावर एखादं चित्र काढणारी ती हौशी चित्रकार. मात्र, ऑगस्ट महिन्यात पहिले तिच्या आईला नंतर तिला आणि वडिलांना कोरोनाने घेरले. आई अनेक वर्षांपासून अस्थमा, रक्तदाब आणि मधुमेहाची रोगी तर वडिलांना अनेक वर्षांपासूनचे गंभीर हृद्य विकार. अशा अवस्थेत कोरोना जडल्याने घरात भीतीदायक वातावरण तयार झाले होते. आई वडिलांची देखभाल करायला एकटी रेणुकाच असल्याने तिने कटुंबातील नकारात्मक वातावरण बदलविण्याची ठरविले. घरात काही वर्षांपूर्वी रंग रंगोटी झाली असताना तेव्हाचे उरलेले पेंट्स आणि ब्रश बाहेर काढले. आणि कागदावर चित्रकारी करणारी रेणुका भिंतीवर वेगवेगळे आकार रंगवू लागली. प्रत्येक पेंटिंग सह घरातला वातावरण बदलत गेले.


रेणुकाने आधी चॉकने भिंतीवर मनातले विचार चित्ररूपात साकारले आणि नंतर त्यात सफाईने रंग भरले. एक एक चित्र आकारात येऊ लागलं आणि आपले काय होईल या भीतीने ग्रस्त आई वडिलांनाही हुरूप येत गेला. नकारात्मकता नाहीशी होऊन घरगुती काढा, डॉक्टरने सांगितलेले उपाय करत करत तिघांनी घराची प्रत्येक भिंत रंगविली. रेणुकाची चित्रकारी आणि त्यात आई वडिलांची मदत. अशातच 14 दिवसांचा कालावधी केव्हा गेला हे कळलेच नाही आणि सर्व कुटुंब कोरोनातून सुखरूप बाहेर आले. आज मीना आणि पुरुषोत्तम खोडे यांना त्यांच्या लेकीचा अभिमान आहे.



खोडे कुटुंब कोरोनाग्रस्त झाल्याने शेजाऱ्यांनी ही संकटकाळात संबंध तोडले होते. परिसरातील नागरिकांकडून भाजी, दूध, मोलकरीण सर्व काही बंद करण्यात आले होतेय अशात नैराश्य झटकून मुलीच्या चित्रकारीत स्वतःला गुंतविले आणि अनेक विकार असताना घरीच कोरोनावर यशस्वी मात केल्याचे सांगताना पुरुषोत्तम खोडे यांचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो.


आज अनेक कुटुंबांमध्ये कोरोनामुळे नैराश्य आणि भीती पसरत आहे. त्या सर्वांनी या रोगाला न घाबरता आपले मन मजबूत करावे आणि घरात, कुटुंबात सकारात्मकता ठेऊन कोरोना विरोधात लढा द्यावा अशीच अपेक्षा खोडे कुटुंब सर्व भारतीयांकडून व्यक्त करत आहेत.