नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका आणि वाचनालये 7 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. मात्र, पुढील दीड महिना एकानंतर एक महत्वाच्या स्पर्धा परीक्षा असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर रस्त्यावर बसून अभ्यास करण्याची वेळ आली आहे.


नागपूरच्या महाराजबाग परिसरात एमपीएससीची परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी फूटपाथवर बसून अभ्यास करत आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व वाचनालये आणि अभ्यासिका सात मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय महापालिकेने घेतले आहे. त्यानंतर बाहेरगावावरून नागपुरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीनं सामोरे जावे लागत आहे. आधीच मागील 1 वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या स्पर्धापरीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. आता 14 मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा त्यानंतर 27 मार्चला अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तर 11 एप्रिलला पीएसआय- एसटीआय-असिस्टंटची पूर्व परीक्षा एकानंतर एक होणार आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा होता.


नागपुरात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र 7 मार्चपर्यंत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कडक निर्बंध


मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. त्यामुळे अभ्यासिका बंद झाल्या. ऐनवेळी महापालिकेने अभ्यासिका बंद केल्याने स्पर्धा परीक्षा देणारे तरुण निराश झाले आहेत. बहुतांशी विद्यार्थी विदर्भातील ग्रामीण भागातून नागपूरला अभ्यासासाठी येणारे असून आता आम्ही अभ्यास कुठे करावा असा त्यांचा सवाल आहे. जेव्हा 50 टक्के क्षमतेने हॉटेल चालत आहे, रेस्टॉरंट चालत आहे तर 50 टक्के क्षमतेने अभ्यासिका चालवायला काय हरकत आहे असा प्रश्न हे विद्यार्थी विचारत आहे. आमच्या करिअरसाठी हा दीड महिना अत्यंत महत्वाचा असताना ऐनवेळी अभ्यासिका बंद झाल्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसून अभ्यास करावा लागत असल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. प्रशासनाने अभ्यासिका सुरू कराव्या अशी मागणी त्यांनी केली आहे.