नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी सरकारी भ्रष्टाचाराबद्दल अजब वक्तव्य केलं आहे. "भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, मात्र भ्रष्टाचार आज यंत्रणेचा भाग बनला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला सरकारी यंत्रणेमधून खणून काढणे अत्यंत कठीण झाले आहे," असं हेमंत नगराळे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.


"आम्ही फक्त लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाया वाढवून अधिकाऱ्यांना भ्रष्ट आचरणापासून दूर ठेऊ शकतो," असं महासंचालक नगराळे म्हणाले. पोलीस आणि महसूल खात्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.


सरकारी यंत्रणेतून भ्रष्टाचार 100 टक्के दूर करता येऊ शकत नाही. म्हणूनच भ्रष्टाचार रोखण्यासाठी जो कायदा करण्यात आला आहे, तो कायदा ही भ्रष्टाचाराला प्रतिबंध करा असं म्हणतो. पण तोच कायदा भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करा, असं म्हणत नसल्याचा अजब तर्कही पोलीस महासंचालकांनी पुढे केला.


दरम्यान, भ्रष्टाचार फक्त पोलीस किंवा महसूल विभागात आहे असे नाही तर सर्वच विभागात भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येत असतात. पोलीस किंवा महसूल विभागात कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने भ्रष्टाचाराचे प्रकरण जास्त दिसून येतात असे नगराळे म्हणाले. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि त्यांनी केलेल्या तपासावर नजर ठेवली तर नक्कीच भ्रष्टाचार कमी करणे शक्य होईल, असंही पोलीस महासंचालक म्हणाले.