नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा अवधी राहिला असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर, भाजपने ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठका सुरू केल्या आहेत. आता एनडीएमधून काही पक्ष बाहेर पडून इंडिया आघाडीत येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या पक्षांनी एनडीएच्या बैठकीत हजेरी लावली होती. त्यातील पक्ष लवकरच इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले.
काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत दावा केला आहे की भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या 38 पक्षांपैकी 4-5 पक्ष 'इंडिया' आघाडीच्या संपर्कात आहेत. एनडीएच्या बैठकीत सहभागी होणारे काही पक्ष येत्या काही दिवसांत विरोधी गटात सामील होतील. मुंबईत 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या आगामी बैठकीत काही गोष्टी पाहायला मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या 38 पक्षांपैकी काही आता 'इंडिया'मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सहभागी होतील, असेही शर्मा यांनी म्हटले.
गेल्या महिन्यात झाली होती एनडीएची बैठक
गेल्या महिन्यात दिल्लीत एनडीएची बैठक झाली होती. या बैठकीत किमान 38 पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीला प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मागील काही वर्षात एनडीए ऐवजी भाजप हे अधिकच अधोरेखित झाले होते. मात्र, 'इंडिया' आघाडीच्या स्थापनेनंतर एनडीएचे महत्त्व भाजपकडून सांगण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्रात नेतृत्व कोणाकडे?
दरम्यान, तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करणार का, या प्रश्नावर शर्मा यांनी थेट उत्तर देणे टाळले. शर्मा यांनी म्हटले की, "देशाची सद्यस्थिती पाहता नेतृत्व कोण करेल हे महत्त्वाचे नाही, तर आपण सर्व मिळून या अहंकारी सरकारला मजबूत शक्ती म्हणून कसे हटवू शकतो हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
आलोक शर्मा म्हणाले की, कोणीही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये नेतृत्व करू शकतो. परंतु देशातील सर्वांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस सर्व राज्यांमध्ये एक मजबूत ताकद म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 2024 हे वर्ष 'इंडिया'चे आहे. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत ते म्हणाले, पंतप्रधान मोदी हे सीबीआय आणि ईडीला अलीकडील कॅग अहवाल, एनएचएआय आणि आरोग्य विमा क्षेत्रातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश कधी देणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.