Nagpur News Update : नागपूर येथील शालेय बस वरील महिला कंडक्टर दीपा दास यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे.  एका पॉलिथिन आणि थर्मोकोलच्या काही तुकड्यांवरून पोलीस या हत्येतील संशयितांपर्यंत पोहोचले आहेत. बचतगटातील पैसे दिलेल्या कुशीनगर येथील सोनी दाम्पत्याने दिपा दास यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  


दिपा दास या बचत गट चालवत होत्या. या बचत गटातून त्या परिसरातील गरजूंना पैसे देत होत्या. कुशीनगर परिसरात राहणाऱ्या शम्मी सोनी आणि सुवर्णा सोनी या दाम्पत्यालाही दीपा दास यांनी मोठी रक्कम उसनवारीवर दिली होती. मात्र, त्या रकमेच्या वसुलीवरून दीपा दास आणि सोनी दाम्पत्यामध्ये वाद होत होते. शनिवारी दुपारी शालेय बस वरील ड्युटी संपल्यानंतर दिपा दास कुशीनगर परिसरात सोनी दाम्पत्याच्या घरी पैशांची मागणी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांचा सोनी दाम्पत्यासोबत वाद झाला. यातूनच सोनी दाम्पत्याने दीपा दास यांची गळा आवळून हत्या केली. नंतर बराच वेळ मृतदेह घरीच ठेवला आणि संध्याकाळच्या सुमारास अंधार होताच सोनी दाम्पत्याने दीपा दास यांचा मृतदेह एका पॉलिथिनमध्ये गुंडाळून इ रिक्षामधून उप्पलवाडी रोडवर निर्जन ठिकाणी नेऊन फेकला. परंतु, ज्या पॉलिथिनमध्ये त्यांचा मृतदेह गुंडाळला होता, त्याद्वारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला आहे. 


रविवारी दुपारी नागपूर पोलिसांना कपिल नगर पोलिस स्टेशन अंतर्गत उप्पलवाडी रोडवर एका प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा मृतदेह गुंडाळून फेकल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तपास केला असता मृतदेह 41 वर्षीय दीपा दास या महिलेचा असल्याचे समोर आले. शनिवारी दीपा दास यांनी त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे त्यांच्या बसमधील सर्व मुलांना घरी सोडले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्या कुशीनगर भागात नेहमीच्या ठिकाणी बसमधून उतरल्या होत्या. मात्र तेथून थेट आपल्या घरी न जाता त्या आपल्या एका ओळखीच्या महिलेच्या घरी गेल्या होत्या. त्या संदर्भात त्यांनी आपल्या मुलीला फोन करून थोड्या वेळाने घरी येते असे सांगितले होते. परंतु, त्या घरी आल्या नसल्यामुळे शनिवारी संध्याकाळी उशिरापासून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यानंतर रविवारी सकाळी कपिलनगर पोलीस ठाण्यात दीपा दास शनिवार दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.  शनिवार संध्याकाळपासून त्यांचे कुटुंबीय व पोलीस त्यांचा शोध घेत असताना रविवारी दुपारी उप्पलवाडी रोडवर प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  


पोलिसांनी असा लावला छडा!


उप्पलवाडी परिसरात पोलिसांनी नव्या कोऱ्या पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला दीपा दास यांचा मृतदेह पाहिला, त्यावेळी तो पॉलिथिन एका रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्यासाठी वापरण्यात येणारा पॉलिथिन असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी त्या पॉलिथिनसह रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या पॅकिंगमध्ये वापरले जाणारे थर्माकोलचे तुकडेही होते. त्यामुळे नव्याने रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा या हत्येशी संबंध आहे असा सुगावा पोलिसांना मिळाला. दीपा दास यांना सर्वात शेवटी सोनी दाम्पत्याच्या घरी जाताना काहींनी पाहिले  होते. तसेच सोनी दाम्पत्याने काही दिवसांपूर्वीच नवा रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन खरेदी केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी दोघांची चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी खून केल्याची कबुली दिली. 


दीपा दासकडून एक लाख रुपये उसनवारीवर घेतले होते. आम्ही मुद्दल फेडली होती, मात्र तरीही दीपा दास अतिरिक्त 50 हजाराच्या व्याजासाठी सतत तगादा लावत होत्या आणि त्रास देत होत्या. शनिवारीही दीपा दास यांनी 50 हजार रुपयांसाठी धमकावले आणि त्यावरूनच वाढ झाल्याचं सोनी दांपत्याने पोलिसांना सांगितलं. याबरोबरच दीपा दास यांची हत्या केल्याची कबुलीगी दोघांनी दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली. 


महत्वाच्या बातम्या


Nagpur  : धक्कादायक! 23 वर्षीय तरुणीची जाळून हत्या, नागपुरातील घटनेने खळबळ