नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले नाही आणि सरकारला नाक दाबून तोंड उघडायला भाग पाडले नाही तर येणाऱ्या पाच वर्षात नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये ओबीसीच प्रतिनिधित्व दिसणार नाही असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी जागर मेळाव्यात बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या वेळेला मराठा मागास आहे की नाही हे ठरवायचे होते. सर्व्हेमध्ये अनेक प्रश्न होते. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी मागास आहे की नाही हे ठरवायचे नाही. ते मंडल आयोगाने आधीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे सरकारने मनात आणले तर इम्पेरिकल डेटा अवघ्या काही दिवसात गोळा करणे शक्य असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन सोप्या पद्धतीने त्यांना ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समजून सांगावा. त्यासाठी लोकांना प्रश्नावली द्यावी. कार्यकर्त्यांच्या या प्रयत्नांशिवाय प्रशासनाचा काहीही अनुभव नसलेल्या आणि अवघ्या 56 आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्री झालेल्यांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचं गांभीर्य कसं कळणार असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर निवडणुका होणार असून त्यापूर्वी आपण ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालो नाही तर ओबीसींचा मोठं नुकसान होईल, नगरपालिका महानगरपालिकांमध्ये ओबीसींचा प्रतिनिधित्व दिसणार नाही अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.
गांधींच्या आंदोलनापुढे इंग्रजांनाही देश सोडून जावं लागलं तर मग हे महाविकास आघाडी सरकार काय आहे असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला. हे सरकार एक नंबरचे घाबरट आहे, जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत नोटा छापून घेणं ए एवढाच उद्योग त्यांच्याकडे असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत निवडणुका होऊ द्यायची नाही. एक तर कायद्याने आरक्षण द्या नाहीतर सर्व पक्षांनी मिळून ठरवावे, जिथे जिथे निवडणूक होणार आहे तिथे तिथे ओबीसींसाठी जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवारच देऊ. सर्व पक्ष असे ठरवणार असतील तर खुशाल निवडणुका घ्या."
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. मंदिरं उघडून घेण्यासाठी अनेक आंदोलन करावे लागले, घंटानाद आंदोलन, थाळीनाद आंदोलन. तेव्हा कुठे आता मंदिरं उघडली. मात्र, त्याला अनेक अटी लावण्यात आल्या आहे. साठ वर्षावरील माणूस मंदिरात जाऊ शकत नाही आणि तुम्ही ( मुख्यमंत्री ) तर कधी मातोश्रीवरून बाहेर पडले नाही तर तुम्हाला कसं कळेल की मंदिरात 60 वर्षावरील लोकच जातात अशी कोपरखळी ही चंद्रकांत पाटील यांनी मारली. मंदिरात जाण्यासाठी सरकारने अट लावली आहे, मंदिरात हे करू नका ते करू नका. मग काय मंदिरात तुमची आरती ओवाळायची का?"
आता राष्ट्रवादी काँग्रेस यात्रा काढणार असल्याचे ऐकलं आहे. मात्र त्यांची यात्रा शेतकऱ्यांना, मराठ्यांना आणि ओबीसींना तुमची आम्ही कशी जिरवली हे विचारण्यासाठी असणार आहे का असा सवाल पाटील यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यात्रेत अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड सारखे नेते राहणार आहे का असा सवालही पाटील यांनी विचारला.
नागपूरच्या सुरेश भट सभागृहात झालेल्या या मेळाव्यात पूर्व विदर्भातून भाजपचे बहुतांशी आमदार, खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :