Nagpur Snake Byte Sting Operation: विषारी सापाच्या दंशानंतर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते. मात्र नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंशानंतर अंधश्रद्धेपोटी भोंदूबाबाकडे जाऊन उपचार केले जात असल्याचे आणि भोंदूबाबा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना मृत्यूच्या दारात ढकलत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीने या संदर्भात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात कट्टा गावात एक स्टिंग ऑपरेशन केलं असून त्यातून समोर आलेला प्रकार संतापजनक आहे.


जमिनीवर सापासारखा सरसळणारा  हा माणूस त्याच्या अंगात नाग आल्याचा बनाव करत आहे. हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील कट्टा गावाचा रहिवाशी असून आपल्या भोंदूगिरीने सर्पदंशावर उपचार करत असल्याचा दावा तो करतो. त्याच्या या भोंदूगिरीची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी सर्पदंशाबद्दल चालणाऱ्या भोंदूगिरीचा सर्व प्रकार उघडकीस आणण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले. संस्थेचा एक सदस्य हातात टाचणीने दोन घाव करून त्याला सर्पदंश झाला आहे असा बनाव करत गावात पोहोचला संस्थेच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी आणल्याचे सांगितले आणि भोंदू बाबा आणि त्याची टीम सक्रिय झाली...


त्यामध्ये गावातील भोंदूबाबा सर्पदंश झालेला माणूस नातेवाईकांनी गावात आणल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना मूर्ख बनवतो, स्वतःच्या अंगात नाग आल्याचा बनाव करत जमिनीवर सापासारख रेंगाळत चालतो आणि साप चावलेल्या ठिकाणी स्वतःच्या तोंडाने विष ओढून काढल्याचा बनाव करून विष उतरल्याचा दावा करतो. हे सर्व भोंदूगिरीचे प्रकार स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणले गेले आहे.


वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचा आरोप आहे की या भोंदूबाबा मुळे गेल्या काही महिन्यात अशाच पद्धतीने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना सापाच्या विषामुळे भयावह शारीरिक व्याधी झाल्या आहेत. वाईल्ड वेल्फेअर सोसायटीने या संदर्भात नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे आणि या भोंदूबाबा वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे कार्यकर्ते ज्या तरुणाला सर्प दंश झाल्याचा बनाव करून सोबत घेऊन गेले होते त्या तरुणावर उपचार केल्यानंतर भोंदू बाबाने भयावह विषारी सापाने तुम्हाला दंश केले होते, त्याचे विष मी काढले आता मला ही अस्वस्थ वाटत आहे, मात्र तुम्ही सुरक्षित आहेत असा खोटा दावा केला होता. मुळात त्या तरुणाला कोणताही सर्पदंश झालेला नसतानाही बाबा तुमचा विष माझ्यात आल्याचा दावा करत होता.


रामटेक तालुक्यासह नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रकार वाढले आहे. आरोग्य केंद्राकडून वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक या आणि अशा इतर भोंदूबाबांच्या विळख्यात अडकून जीव गमावत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या भागात आरोग्य कॅम्प घेऊन सर्पदंशाबद्दल जागृती करावी आणि अशा भोंदूबाबांचा मूर्ख बनवण्याचा धंदा बंद पडावा अशी मागणी ही होऊ लागली आहे.


ही बातमी वाचा: