Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा (Wardha) नगरित आज, शुक्रवारी 3 फेब्रुवारीला 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरागत ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धा नगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.


ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, मदर टेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात 'जय हरी विठ्ठल' असा गजर केला. ग्रंथ दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी पुष्पावर्षाव करुन होत होता. संमेलन स्थळावर पोहोचताच साहित्याचा जयघोष झाला.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि दिंडीचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर वाजत गाजत, विठ्ठलाच्या गजरात ग्रंथ दिंडी संमेलन स्थळ असलेल्या महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालयाकडे रवाना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोस्ट ऑफिस चौक, सेंट अँटॉनी नॅशनल स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही ग्रंथ दिंडी निघाली.


सूत कातून ग्रंथ दिंडी


विशेष म्हणजे, चरख्यावर सूत कातून ग्रंथ दिंडी तयार करण्यात आली. वर्धा जिल्ह्याची परंपरा यातून व्यक्य करण्यात आली. दिंडीत लिळाचरित्र, श्रीज्ञानेश्वरी, भारताचे संविधान आदी ग्रंथांचा समावेश होता. 


मराठीची पताका सर्वसमावेशक


सेंट अँटनी नॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक फादर सुबिन, व्यवस्थापक फादर विनसंट, उपमुख्याध्यापक सिस्टर जिस रॉस  यांनी ग्रंथ दिंडी शाळेसमोर पोहोचताच सूत हार घालून आणि मराठी परंपरेप्रमाणे दिवा ओवाळून आणि तिळा लावून स्वागत केले. दिंडीमध्ये जात, धर्म, विचार भेद दूर सारुन सारेच सहभागी झाले आणि मराठीची ध्वज पताका आमच्या हाती सर्वसमावेशक असल्याची भावना दृढ केली. 


आज साहित्‍य संमेलनात… 



  • दुपारी 2.00 वाजता – ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद

  • दुपारी 4.30 वाजता - संमेलनाध्‍यक्षांचे भाषण

  • सायं. 5.30 वाजता – ‘आम्‍हा लेखकांना काही बोलायचे आहे’ वर परिसंवाद   

  • सायं. 7.00 वाजता – ‘ललितेतर साहित्‍याची वाढती लोकप्रिय’वर परिसंवाद 

  • रात्री 8.30 वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन 


मनोहर म्‍हैसाळकर सभामंडप



  • दुपारी 2.00 वाजता – कथाक‍थन

  • सायं. 6.30 वाजता – ‘विदर्भातील बोलीभाषा’ वर परिसंवाद   

  • सायं. 8.00 वाजता – ‘मृदगंध वैदर्भीय काव्‍यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम 


इतर कार्यक्रम



  • दुपारी 2.00 वाजता – प्रा. देविदास सोटे कविकट्ट्याचे उद्घाटन 

  • दुपारी 2.00 वाजता – कविवर्य सुरेश भट गझल कट्टयाचे उद्घाटन 

  • दुपारी 4.00 वाजता – ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन


ही बातमी देखील वाचा...


Nagpur Politics : नागपुरात 'पदवीधरच्या' बदल्यात 'शिक्षक', भाजपमध्ये हिशोब बरोबर झाल्याची चर्चा!