नागपूर: ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री होणार होते, त्यावेळी आपण त्यांच्यासोबत होतो, अंबादास दानवेंचा त्या वेळी जन्मही झाला नव्हता अशी टीका प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली. बच्चू कडूंना उद्धव ठाकरे यांनी मंत्री बनवलं होतं असं अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. त्यावर बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले नसते तर जेलमध्ये गेले असते या आदित्य ठाकरे यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांनी त्यावर पुरावे दिले असते तर बरे झाले असते असंही ते म्हणाले. 


अंबादास दानवे यांच्यावर टीका 


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी चांगलीच टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापन करायची होती त्यावेळी अंबादास दानवे यांचा जन्मही झाला नव्हता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाजून पहिले दोन अपक्ष आमदार होते त्यामध्ये मी होतो. 


आदित्य ठाकरे यांनी पुरावे द्यावेत 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले नसते तर जेलमध्ये गेले असते असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आदित्य ठाकरेनी आरोप करताना पुराव्यासोबत आरोप केला तर बरं झालं असतं.आता कुठल्या कारणासाठी जेलमध्ये गेले असते, काय झालं असतं हे त्यांनी स्पष्ट करावं. या देशात सध्या आरोप करताना पुरावे न देता बोलणे, बातमी झाली आणि दोन दिवस झाले का विषय संपवणे असा कार्यक्रम सुरू आहे. एवढा तुमचा दावा मजबूत असेल तर पुरावे द्यावे. सगळ्यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत खोके घेतले म्हणून पुरावे द्यावे आणि आत टाकावे.


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, सरकार निवडणुकीला घाबरण्याचं काही काम नाही. सगळ्याच निवडणुका झाल्या पाहिजेत. नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुका लागल्या पाहिजेत. नोव्हेंबर- डिसेंबर पर्यंत निवडणुका लागतील अशी आशा आहे. अजून लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार व्हायचे आहे. अजून तारीख ठरली नाही. लग्न जुळलं नाही तर मंगल कार्यालयाचा उपयोग काय? तारीख ठरल्यावर आम्ही निर्णय देऊ.


आम्हाला 15 जागा दिल्या तर आम्ही ताकतीने लढू असं आमदार बच्चू कडू म्हणाले. ते म्हणाले की, "प्रत्येकाने आपापल्या घर जपायचं असत. तुम्ही असू देत किंवा मी असू दे किंवा कोणीही असू दे.. प्रत्येकाने आपलं घर न जपता काम सुरू केलं तर त्याला पक्ष सोडून समाजसेवा करावी लागेल. आम्ही राजकीय पक्ष आहोत राजकीय पार्टी म्हणून समोर जाऊ."


आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ देऊ नका, आता डायरेक्ट 2024 मध्येच विस्तार करू आणि बच्चू कडूची भूमिका मजबूत राहील असं ते म्हणाले. माझ्या नाराजीचा काहीही संबंध नाही आणि माझी नाराजी दूर करणारा अजून कोणी निर्माण झाला नाही असंही ते म्हणाले. 


ही बातमी वाचा: