नागपूर: नागपुरात भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या आभा पांडे (Abha Pande) यांनी निवडणूक लढवण्यासाठी चंग बांधला आहे. आता अजितदादांनी थांबवलं, तरी भाजप आमदाराविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे (Abha Pande) यांनी नागपुरात भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघात दंड थोपटले आहेत. त्यामुळे नागपुरात महायुतीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातच महायुतीत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे


नागपुरात महायुतीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातच महायुतीत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे नागपूर पूर्व या भाजपच्या अत्यंत सुरक्षित गडात राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्यास चित्र निर्माण झालं आहे.


 नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून मी कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या विरोधात निवडणूक लढवावी ही इथल्या स्थानिक जनतेची मागणी आहे. मी जनतेच्या विरोधात जाऊ शकत नाही असे सांगत आभा पांडे (Abha Pande) यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. अगदी अजित पवार यांनी थांबवले तरी आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही आभा पांडे यांनी जाहीर केल्यामुळे भाजपच्या मतदारसंघात त्या बंडखोरी करणारच हे जवळपास निश्चित झाले आहे. कृष्णा खोपडे यांनी गेले 15 वर्ष या मतदारसंघात काहीही केलेले नाही. त्यामुळेच जनतेच्या इच्छेनुसार निवडणूक लढवण्याचे ठरविल्याचे आभा पांडे म्हणाल्या  आहेत.


जनतेने केलेल्या आग्रहामुळे मी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, भाजप या जागेवरील दावा सोडो अथवा न सोडो मी या निवडणुकील उभी राहणार आहे, मतदारसंघात गेल्या ६ महिन्यांपासून मी तयारी सुरू केली आहे, गेली १५ वर्ष आमदार असलेल्यांनी काय विकास केला, ३ तासांच्या पावसात नागपूर तुंडूब भरलं, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, या आमदारांनी गेल्या १५ वर्षांत जनतेचे प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप देखील आभा पांडे यांनी केला आहे. 


त्याचबरोबर मी या निवडणुकीला उभं राहणार असल्याचं अजित पवारांच्या कानावर घातलं असल्याचं देखील आभा पांडे यांनी म्हटलं आहे, जर पक्ष बैठकीत ही जागा भाजपला गेली, अजित पवार (Ajit Pawar) ही जागा माझ्यासाठी आणू शकले नाहीत, तरी देखील मी या निवडणुकीला उभं राहणार आहे, असं आभा पांडे यांनी सांगितलं आहे.

Video -  Abha Pande Nagpur : दादांनी थांबलं तरी लढणार, आभा पांडे भाजपविरोधात आक्रमक