नागपूर: सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यचे देखील सूर बदलण्याचे दिसून येत आहे. मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पंचजन्यने आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे, राजकीय स्वार्थासाठी गल्लीबोळामध्ये असलेल्या वाद उकरून काढण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. मात्र, असे वाद टाळणं गरजेचे आहे असं सांगत पांचजन्यने मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. दरम्यान  मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर साधुमंतांमध्ये याबाबत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. कुंभमेळ्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याने साधू महंतांमध्ये दोन वेगवेगळे गट दिसून येत आहेत.


नेमकं काय आहे प्रकरण 


मोहन भागवत यांनी ज्यावेळी मंदिर मशिदींच्या विवादाला घेऊन त्याचा राजकीय वापर होऊ नये असं विधान केलं होतं. त्याचवेळी योगायोगाने ऑर्गनायझर मुखपत्र, मुखपृष्ठ आहे, ती वेगळी होती आणि त्याचा परिणाम असा दिसून आला की, सर संघ चालक मोहन भागवत यांची भूमिका आणि त्या लेखाची भूमिका विरोधाभासी दिसून आली. ते योगायोगाने झाल्याचं ऑर्गनायझरचं म्हणणं आहे त्यानंतर ऑर्गनायझरने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाक्याचे समर्थन केलं आणि आता पांचजन्य आणि ऑर्गनायझर यांनी मोहन भागवत यांच्या वाक्याचा समर्थन केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 


अग्रलेखामध्ये काय म्हटलं आहे?


राजकीय स्वार्थासाठी मंदिरांचा वापर करणे गैर आहे. गल्ली बोळात असे वाद उकरून काढत राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. विशाल विवेकवादी दृष्टिकोन आचारावा असं आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे. मंदिर ही हिंदूंच्या श्रद्धेचा केंद्र मात्र त्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, मंदिराबाबत अनावश्यक भ्रामक वाद निर्माण केले जात आहेत. सोशल मिडियामुळे हे वाद विनाकारण फैलावतात. हे मुद्दे पांचजन्यच्या अग्रलेखात मांडण्यात आले आहेत. 


भागवतांच्या वक्तव्यानंतर साधुमहंतांमध्ये तीव्र पडसाद


सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर साधुमहंतांमध्ये याबाबत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. कुंभमेळ्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याने साधू महंतांमध्ये दोन वेगवेगळे गट दिसून येत आहेत. एक गट मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समर्थन करत आहे तर दुसरा गट मात्र त्यांच्या विरोधात आहे. 


जागतिक स्तरावरच्या घडामोडीचा आढावा घेऊन देशात शांतता लाभावी यासाठी मोहन भागवत यांनी मत व्यक्त केल्याचं काळाराम मंदिराचे पुजारी, आणि निर्वाणी आखड्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दावा केला आहे. प्रत्येक मशिदी खाली शिवमंदिर शोधू नका असे म्हणाले त्याचा अर्थ संघ सौम्य भूमिका घेत आहे. असा अनेकांनी अर्थ काढला त्यामुळे विरोध होत आहे, तर जागतिक पातळीवर हा निर्णय योग्य असल्याचा  काही साधू महंतचा दावा आहे. प्रयागराज कुंभमेळात होणाऱ्या धर्म परिषदेत मोहन भागवत यांच्या विधानावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अनेक वर्षापासून संघच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करत आला आहे. त्यामुळे विरोध करण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे. 


याबाबत निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर दास पुजारी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं, दोन मतप्रवाह आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे विचार मांडले त्या विचारांशी सहमत असलेला एक गट आणि दुसरा त्यांच्या विरोधात एक गट आहे. आपण जेव्हा सरसंघचालक काय म्हणतात याच्याकडे आपण पाहिलं तर आज जागतिक स्तरावरती इराण-इराक,पाकिस्तान-अफगाणिस्तान बांगलादेश आपल्या विरोधात काय भूमिका घेतोय, श्रीलंका काय भूमिका घेतोय, या माध्यमातून जागतिक स्तरावरच्या घडामोडीचा आढावा घेऊन भारत अशांत होऊ नये या मागची भूमिका त्यांच्या वक्तव्याच्या पाठी आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. ज्यावेळी सरसंघचालक काही विषय मांडत असतात, त्या विषयाच्या मागे फार मोठा अभ्यास आहे. उठले आणि बोलले अशी गोष्ट कधीही संघात होत नाही, त्यामागे काही विशेष हेतू असतात. ते हेतू समजायला देखील आपल्याला एखाद वर्ष दीड वर्ष जावे लागते. गेल्या 75 वर्षापासून हिंदुत्ववादी जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेचे सरसंघचालक नित्यपूजन्य आहेत, असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.