OBC Reservation : नागपूर : केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा (Empirical Data) तयार असून सुद्धा ते का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत "भाजपची भूमिका ओबीसींच्या (OBC Reseveration) राजकीय आरक्षणाच्या विरोधातली आहे." अशी टीका राज्याचे मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येत नाही, असा निर्णय न्यायालयाने नुकताच दिला होता. त्यामुळे राज्यभरात राजकीय नेत्यांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, ओबीसी आरक्षणा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. आरक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच  मंत्री वडेट्टीवार यांनी आज भाजपर निशाणा साधला आहे. 


"एकीकडे राज्यांना सांगायचे की इम्पिरिकल डेटा तयार का केला नाही? दुसऱ्या बाजूला तयार असलेला डेटा राज्यांना द्यायचा नाही. म्हणजेच त्यांना राज्यांमध्ये असंतोषाची स्थिती निर्माण करायची आहे. राज्य अस्थिर करायचे आहे. केंद्राला असं वाटतंय की राज्याने जनतेचा असंतोष आपल्यावर ओढवून घ्यायचा आणि केंद्रसरकारने डोळे मिटून गप्प बसायचं, त्यांचे हेच धोरण ओबीसी विरोधी आहे."अशी टीका मंत्री वडेट्टीवार यांनी केली. 


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा भाजपला टोला 


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही ओबीसी आरक्षणावरून भाजपला टोला लगावला आहे. ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भाजपनेच भिजत ठेवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात केंद्रासोबत पत्रव्यवहार करुन इम्पिरिकल डेटा मागितला होता. मात्र त्यावेळी तो उपलब्ध नव्हता, यांनी पैसे देखील पुरवले नाहीत. इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे ही या सरकारची भूमिका आहे. ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याचे पाप भाजपने केले आहे." असा हल्लाबोल मिटकरी यांनी केला आहे. 


"पैशांच्या जोरावर चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडून आणून ओबीसी रोष कमी करण्याचा प्रयत्न भाजपने केलाय" अशी टीकाही मिटकरी यांनी केली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या