बाबुलखेडा परिसर गेले 28 दिवस कंटेन्मेंट जोन असल्याने तिथल्या नागरिकांच्या दैनंदिन कार्यांवर तसेच रोजगारावर अनेक निर्बंध आले होते. आठ जून रोजी बाबुलखेडा परिसरातून कंटेन्मेंट झोन शिथिल करत लोकांना रोजगार आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी मुभा देण्यात आली. मात्र, 11 जूनच्या पहाटे काही तरुणांनी भर रस्त्यावर समीर खान नावाच्या एका गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी शहरभरातून तीस ते चाळीस तरुण एका ठिकाणी जमा झाले होते. त्यापैकी अनेक जण गुन्हेगारी वृत्तीचे होते. हे सर्व तरुण भर रस्त्यात मध्यरात्री नंतर तलवारीने केक कापत जोरजोरात ओरडत असताना परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वीपर्यंत ( म्हणजेच 8जूनपर्यंत ) आपला परिसर कंटेन्मेंट झोनमधून मुक्त झाला आहे. अजूनही कोरोनाची भीती पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे एका ठिकाणी चाळीस लोकं गोळा होऊ नका अशी समजूत ज्येष्ठ नागरिकांकडून घालण्यात आली. मात्र, समीर खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी समजूत घालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर दगडफेक सुरु केली. एवढेच नाही तर घर जाळून टाकण्याची धमकी दिली.
गुंडांचा आक्रमक पवित्रा पाहून परिसरातील तरुण विजय शितोळे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केले. मात्र, गुंडांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत घराचं आर्थिक नुकसान केलं. परिसरात बेकायदेशीररीत्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करून नागरिकांच्या घरावर दगडफेक केली जात असल्याची माहिती विजय शितोळे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विजय त्यांच्या घरासमोर उभे राहून पोलिसांची वाट पाहत असताना अंधारात लपलेल्या गुंडांनी विजय शितोळे यांच्या हातावर आणि मानेवर चाकूने वार करत त्यांना जखमी केले.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सर्व तरुण पळून गेले. नंतर पोलिसांनी या प्रकरणी समीर खान याच्यासह सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मात्र, त्या ठिकाणी गोळा झालेल्या चाळीस तरुणांपैकी इतर सर्व अद्याप फरार आहेत. आता हे गुंड बर्थडे पार्टीची माहिती पोलिसांना देणाऱ्या विजय शितोळे यांना हत्येची धमकी देत आहेत. त्यामुळे नागपुरात काही गुंडांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झालेच आहे. त्यांच्या मग्रुरीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती ही निर्माण झाली आहे. दरम्यान शासनाने लोकांना त्यांची उपजीविका आणि अत्यावश्यक कामे करता याव यासाठी लॉकडाऊन शिथिल केले आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर येऊन बर्थडे पार्टीसाठी या शिथिलतेचा गैरवापर करू नये असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे.