नागपूर : राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतं. यासंदर्भात नाना पटोलेंसह इतर काँग्रेस नेत्यांनी काल (10 जून) विधीमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. काही वरिष्ठ अधिकारी काँग्रेसच्या मंत्र्यांना जुमानत नसल्याचा सूर यावेळी आळवण्यात आला. एवढंच नाही तर राज्य सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसएवढं महत्त्व काँग्रेसला मिळत नसल्याची खदखदही दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.


विधानभवनात काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या या भेटीत नाना पटोले यांच्यासह ऊर्जामंत्री नितीन राऊत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार उपस्थित असल्याचं कळतं. तुकाराम मुंढे यांना काढा, असं नाना पटोले उद्धव ठाकरेंना म्हणाल्याचं समजतं.


काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरु आहे?


प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधातील नाराजी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी हे नेत्यांची एप्रिल महिन्यात मुंबईत बैठक झाल्याचं कळतं. चार गाड्यांमधूने एकाच दिवशी ही नेते मंडळी मुंबईला रवाना झाली होती. परंतु कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: न भेटता सचिव मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या घरी पाठवल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या बैठकीचे एक्स्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.



अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न सांगता त्यांच्या खात्याच्या सचिवांनी जो प्रस्ताव परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणला त्यावरुन नाराजीचं वादळ उठलं. हाच मुद्दा चारही काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर रेटल्याचं कळतं. जर जिल्ह्यात पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी निर्णय घेत असतील, तर तेही रुल्स ऑफ बिझनेसमध्ये मंत्र्यांच्या अधिकाराचे हनन करण्यासारखेच आहे अशी भूमिका मांडली. नागपूर जिल्ह्यात हेच तुकाराम मुंढेंकडून होत असल्याची तक्रार त्यांनी केली. तर सर्वोच्च स्तरावर म्हणजे थेट मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडूनही अशीच वागणूक मिळत असल्याची ही नाराजी काँग्रेस नेत्यांची आहे.


सत्ता कोणाचीही असो, नेते आणि मंत्र्यांना आपल्या खात्याचे अधिकारी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, आयुक्त यांच्या नेमणुकीत सहभाग हवा असतो. मात्र हा सहभाग सध्या काँग्रेस मंत्र्यांना मिळत नसल्यामुळे एकंदरीत नाराजीचे वातावरण आहे. महाविकासआघाडी तयार झाली तेव्हाच नाराज विजय वडेट्टीवार यांनी आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला होता. हे वादळ शमलं पण राष्ट्रवादी आणि शिवसेना, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत काहीच स्थान नसल्याची भावना नेत्यांमध्ये निर्माण झाली. काँग्रेसची बाजू मांडण्यात, काँग्रेसला वर्चस्व मिळवून देण्यात कुठेतरी बाळासाहेब थोरात कमी पडत आहेत ही सुद्धा आंतरिक वादाची भूमिका तयार झाली. नेमके हेच मुद्दे घेऊन या चार नेत्यांनी एप्रिलमधील मुंबईवारी केल्याचं कळतं. पण त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटता आलं नाही. मात्र काल विधानभवनात त्यांनी ती संधी अखेर साधलीच.


या लॉकडाऊनच्या दरम्यान अजून एक महत्त्वाची घडामोड काँग्रेसमध्ये घडली. ती म्हणजे नाना पटोले यांनी दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदासाठी केलेली वारी आणि प्रयत्न. यामध्ये त्यांना घुसमट होत असलेल्या इतरही काँग्रेस मंत्र्यांचे समर्थन असल्याचं कळतं. त्यात बाळासाहेब थोरात यांनीही आपल्याकडे तीन पदे असल्यामुळे एखादी जबाबदारी कमी करावी असं सांगितल्यामुळे पटोले यांचा मार्ग मोकळा असल्याचं समजते. कुठेतरी अजून हा नेतृत्व बदलझाला नसला, तरी त्या भूमिकेत नाना पाटोले आले आहेत हे मात्र नक्की.


कोविडच्या परिस्थितीत सर्वच पक्ष आणि मंत्र्यांचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे बरेच मुद्दे हे आतल्याआत धुमसत असले, तरी ते उफाळून बाहेर येत नाहीत. पण परवाची केबिनेट आणि कालची चर्चा हे राज्यातील राजकीय अनलॉकचीच सुरुवात झाल्याचे द्योतक आहे. एकीकडे जसे कोरोनाचा पीक यायचे आहे असे सांगितलं जातं, अगदी तसंच या राजकीय घुसमटीचा, नाराजीचा पीक कधी आणि कसे होईल हे आता जरी सांगता येत नसले, तरी याची दखल घेतली नाही तर ते येणार हे नक्की.


Nagpur | तुकाराम मुंढे, अजॉय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस आग्रही; मुख्यमंत्र्यांशी चर्चा