नागपूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नागपुरातील भूषण सतई यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला आहे. काटोल तालुक्यातील जम्मू-काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सेनेत कार्यरत नायक भूषण सतई हे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले सर्व नियम पाळून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमगण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत 20 आणि 28 वर्षांचे हे सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण
महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर नागपूरचे भूषण रमेश सतई हे 28 वर्षांचे होते. भूषण सतई सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. 2010 मध्ये निवड झाल्यानंतर 23 ऑक्टोबर 2011 मध्ये रितसर प्रशिक्षण पूर्ण करून भूषण मराठा बटालियनमध्ये रुजू झाले होते. गेल्या एक वर्षांपासून त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये होती. सध्या ते सीमेजवळच्या गुरेज सेक्टर मध्ये कार्यरत होते. काल सीमेवर झालेल्या गोळाबारात भूषण पाकिस्तानी सैन्याला चोख प्रतिउत्तर देत असताना पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांचा माऱ्यात एक तोफगोळा त्यांच्या बंकरवर पडला आणि त्यातच भूषण यांना वीरमरण आले. सध्या त्यांनी बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु केली होती. बहिणीच्या लग्नानंतर भूषण लग्न करणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना वीरमरण आले. भूषण यांचे आई वडील शेतमजूर असून कुटुंबाची परिस्थिती भूषण नोकरीवर लागल्यानंतर हळूहळू सुधारत होती.
आपलं आयुष्य गरिबीत जगणाऱ्या या कुटुंबासाठी भूषण यांचं लष्करात नोकरीला लागणं अभिमानास्पद होतं. देशसेवेसोबतच आई-वडिलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी सतत झटणारे भूषणही आनंदी होते. अशातच पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भूषण यांना वीरमरण आलं. भूषण यांचे वडील शेतमजुरी करायचे. पण मुलगा भारतीय सैन्यात लागल्यानंतर त्यांनी शेतमजुरी करणं सोडून दिलं होतं. भूषण यांची लहान भावंड दोघेही बेरोजगार आहेत. अत्यंत हलाखीचे दिवस काढणाऱ्या सतई कुटुंबियांसाठी भूषण सतई हे आधार होते. पण ऐन दिवाळीत संपूर्ण कुटुंबाचा आधार असलेल्या भूषण यांना शेवटचा निरोप देण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
भावाला ओवाळण्याऐवजी अखेरचा निरोप देण्याची वेळ, शहीद ऋषिकेश जोंधळेंवर कोल्हापुरात अंत्यसंस्कार