कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. ऋषिकेश जोंधळे यांच्यावर त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेश जोंधळे यांना त्यांचे चुलत बंधू दीपक जोंधळे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.


जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमगण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत 20 आणि 28 वर्षांचे हे सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.



ऋषिकेश जोंधळे हे एकुलते एक होते. एकुलता एक असल्याने कुटुंबीयांनी सैन्यात जाण्याला विरोध केला, पण 2018 साली एकदा प्रयत्न करतो म्हणून घरातल्यांची समजूत काढली आणि पहिल्याच प्रयत्नात ऋषिकेश सैन्यात भरती झाले. पहिलीच पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाले. गेल्या बुधवारी ऋषिकेश यांचा वडिलांसोबत फोनवरुन संवाद झाला होता. त्यावेळी फोनमधून फायरिंगचा आवाज वडिलांना येत होता. ऋषिकेश यांना एक छोटी बहीण आहे. आज भाऊबीजचा दिवस भावाला ओवळण्याचा दिवस. मात्र आजच्याच दिवशी ऋषिकेश यांची बहिण कल्याणीला भावाला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली.


शहीद भूषण सतई यांच्यावरही आज अंत्यसंस्कार
तर पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेले नागपूरचे भूषण सतई यांनाही आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. कामठीच्या कॅन्टोन्मेंटमध्ये असलेल्या अमर योद्धा इथे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांना पुष्पचक्र अर्पण केलं. यानंतर काटोल येथे त्यांच्या घरी पार्थिव नेण्यात आलं. गावात त्यांची अंत्ययात्रा निघाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.


संबंधित बातम्या


पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरचे भूषण सतई शहीद


भारतीय जवानांचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, पाकच्या 8 सैनिकांचा खात्मा, बंकरसह लॉन्च पॅडही उद्ध्वस्त