छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून देखील प्रयत्न केले जात आहे. तर, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एकदा चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. असे असतानाच मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने 29 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. "यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले, तसेच आरक्षणासंदर्भात आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षण या विषयावर आपले सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे अशी खात्री ही यावेळी उपस्थित बांधवांना दिली, असल्याची माहिती फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यातील गावागावात आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडतायत. अशात सरकारविरोधात मराठा समाजात मोठा रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन, आरक्षणाची मागणी केली आहे. फडणवीस नागपूर येथे असतांना या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने फडणवीस यांना निवेदन देऊन, आपल्या मागण्या मांडल्या. याबाबत खुद्द फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
जरांगेंसोबतच्या चर्चेचं काय?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6 दिवस आहे. दरम्यान, नेत्यांना गावबंदी करण्याची घोषणा करणाऱ्या जरांगे यांनी एक पाऊल मागे घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत आंतरवालीत चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. मात्र, ही चर्चा एकदाच होईल असेही जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे जरांगेंसोबतच्या चर्चेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
उपोषणाचा सहावा दिवस...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, दोन-तीन वेळा विशेष विंनतीवरून पाण्याचा घोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तर, जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: