नागपूर : "देर आये दुरुस्त आये... जरांगे यांचे उपोषण सोडवायला सरकारला उशीर झाला आहे," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सरकारला आता उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम शिल्लक असल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आज अखेर आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्याच्या हस्ते ज्यूस पिऊन सतराव्या दिवशी उपोषण सोडलं.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "जो व्यक्ती (जरांगे) समाजासाठी काम करतो, त्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळे सरकारने उपोषण सोडवले असले तरी त्यात उशीर झाला आहे. जशी उपोषण सोडवण्याची जबाबदारी सरकारची होती तशीच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारची आहे आणि ती जबाबदारी सरकारने लवकर निभवायला हवी."
'उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम सरकारला उरलेय'
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसी समाजालाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास देण्याची आवश्यकता आहे. आम्ही मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितले पाहिजे. तसेच जिथे जिथे ओबीसी उपोषणावर बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचे उपोषण सोडवावे. कारण सरकारला आता उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम शिल्लक आहे असा उपरोधिक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिष्टाई करायला फक्त शिंदे गटाचे आणि भाजपचे मंत्रीच गेले अजित पवार गटाचे कोणीही गेले नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणापासून अजित पवार गटावर लांब का या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये समन्वय नाही. या सरकारमध्ये सब कुछ आलबेल आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह असल्याचं म्हटलं.
'तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील, अन्यथा...'
निवडणुकीला पाच ते आठ महिने शिल्लक आहेत. या कालावधीत मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकांच्या तोंडाला पाने पुसतात हे लवकरच स्पष्ट होईल. या काळात सरकार आरक्षण देऊ शकले, तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील, अन्यथा लोक सर्व काही पाहत आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.