नागपूर : एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमवीराने तरुणीच्या मामेभावाची हत्या केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. राहुल तुर्केल आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याच्या गैरसमजातून आरोपी रिचेश सिकलवारने त्याचा जीव घेतला.
नागपूरच्या गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या राहुल तुर्केल या तरुणाचा मृतदेह आढळला होता. 28 वर्षांचा राहुल काल सकाळीच रिचेश सिकलवार आणि त्याच्या काही मित्रांसह निघाला होता. रिचेशने वाढदिवसानिमित्त गाडगेनगरातील घरी पार्टी ठेवली आहे, असं राहुलने आपल्या आईला सांगितले होतं. मात्र संध्याकाळी रिचेशच्या घरी राहुलचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला.
आरोपी रिचेश सिकलवारचं राहुलच्या मामे बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र रिचेशची वागणूक पाहून राहुलची बहीण आणि तिचं कुटुंबीय रिचेशला पसंत करत नव्हते. वर्षभरापूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हणजेच राहुलच्या मामाने तिचं लग्न जमवलं होतं. यामुळे आपला मित्र राहुलनेच प्रेमसंबंधांत अडसर आणल्याचा रिचेशचा समज झाला होता.
विशेष म्हणजे तरुणीच्या लग्नानंतरही रिचेश तिचा पिच्छा सोडत नव्हता. रिचेशने त्या तरुणीच्या सासरी चुकीची माहिती पसरवल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवून दिलं. तरुणी माहेरी परतल्यामुळे तिच्याशी लग्न करण्याची इच्छा पुन्हा रिचेशच्या मनात निर्माण झाली.
रिचेशने राहुल आणि राहुलच्या आईकडे लग्नासाठी मदत करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे रिचेश सूडभावनेने पेटला.
रिचेश रविवारी सकाळी पूर्ण नियोजन करुन राहुलच्या घरी पोहचला. माझा आज वाढदिवस आहे, आपण पार्टी करु, असं सांगून तो राहुलला घेऊन गेला. त्याला मनसोक्त दारु पाजली आणि आपल्या घरात त्याची हत्या करुन मृतदेह घरात तसेच ठेवून बाहेरुन कुलूप लावून तो फरार झाला.
संध्याकाळी शेजाऱ्यांनी रिचेशच्या घरी रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह दिसल्याची माहिती पोलिसांना दिली आणि सर्व प्रकरण समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी रिचेश सिकलवारला अटक केली आहे. तर त्याला या हत्या प्रकरणात आणखी कोणी मदत केली आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, ज्या घरात हत्येची घटना घडली तिथे कुंकू आणि इतर पूजा साहित्य आढळल्याने या हत्या प्रकरणामागे अंधश्रद्धेचा प्रकार तर नाही ना, याचा तपासही पोलिस करत आहेत. सध्या तरी त्यासंदर्भातले कोणतेही पुरावे तपासात पुढी आलेले नाहीत.
एकतर्फी प्रेमात अडसर असल्याचा समज, प्रेमवीराकडून तरुणीच्या मामेभावाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2019 04:11 PM (IST)
एकतर्फी प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या गैरसमजातून नागपुरातील तरुणाने तरुणीच्या मामेभावाची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -