नागपूर : एखाद्याकडे नक्षली साहित्य सापडले तर त्याला अटक करणे आवश्यक नाही. कारण तसे केले तर मलाच अटक करावी लागेल, कारण मी पण हे साहित्य वाचलं आहे. मात्र हे साहित्य घेऊन कुणी देशविघातक कृत्य करत असेल आणि तसे पुरावे असतील तर त्यावर कारवाई करावीच लागेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.


मुख्यमंत्री 99 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात बोलत होते. देशाच्या मुळ रक्तात सहिष्णुता आहे. देशावर अनेक आक्रमण झाली, त्यांना या संस्कृतीने स्थान दिले. जगातून ज्यांना हाकलून दिले गेले त्यांना या संस्कृतीने जागा दिली, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


भारतात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे योग्य आहे त्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. भाजप सरकार संविधानाच्या विरोधात कधी जाणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. एकदाच या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर गदा आली आणि त्याला या देशाने परतवून सुद्धा लावलं. आज तशी परिस्थिती नाही. मात्र या देशात अभिव्यक्ती स्वतंत्र नाही, असं कुणीही समजण्याच कारण नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.


आम्ही संविधानाच्या बाहेर जाऊन स्वार्थासाठी कधीही कुठलंही काम करणार नाही. जर कुठे असं वाटलं तर टीका करावी, आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करु, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.


व्हिडीओ- UNCUT | 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण