Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा जेमतेम सुरु झाला असला तरी विदर्भात (Vidarbha) अनेक ठिकाणी कमाल तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये (Akola) तर पारा फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सिअसपर्यंत जातो की काय अशी परिस्थिती आहे. अकोल्यात 38.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील अकोल्यात फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमानाचा हा उच्चांक आहे. नागपुरातही (Nagpur) पारा 38 अंशापर्यंत पोहोचला आहे. अकोला आणि नागपूरसह सर्वच जिल्ह्यात सध्या कमाल तापमान सामान्यापेक्षा तीन ते चार अंश जास्त आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्यात होते त्याच पद्धतीने अंगाची लाहीलाही होणे सुरु झालं आहे. 


Maharashtra Vidarbha Temperature : पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील इतर जिल्ह्यांचा पाराही वाढणार!


दरम्यान दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात असले, तरी रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था विदर्भात सर्वत्र पाहायला मिळत आहे. येणारा उन्हाळा विदर्भवासियांसाठी नेहमीपेक्षा जास्त कठीण असेल याची चाहूल आताच लागायला लागली आहे. हवामान विभागाच्या मते येणाऱ्या चार ते पाच दिवसात पूर्व विदर्भात नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत पारा आणखी वाढून 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे.


Maharashtra Vidarbha News : तापमान आणि वातावरणातील चढ-उताराचा फटका गहू आणि कांद्याच्या पिकांना!


गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. तापमान आणि वातावरणातील चढ-उताराचा फटका गहू आणि कांद्याच्या पिकाला बसला आहे. तापमानातील या दोलायमानतेचा मोठा फटका यावर्षीच्या गहू उत्पादनावर होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवसा खूप ऊन आणि रात्री खूप थंडी अशा क्लायमेट फ्लक्चूएशन'चा सध्या अनुभव येत आहे. दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा रात्री 10 ते 15 अंशांपर्यंत खाली उतरत आहे. यामुळे गव्हाचं पीक कालावधीपूर्वीच पक्व होण्याची परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती कांदा पिकाचीही आहे.


Maharashtra Vidarbha Temperature : कसा असेल यंदाचा उन्हाळा?


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा उन्हाळा लवकरच सुरु होणार आहे. यासोबतच पुढचे काही तापमान पुन्हा एकदा घट होणार असून त्यानंतर काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त राहणार असल्याची शक्यता आहे. यासोबतच, यंदा उन्हाळ्यात तापमान खूप वाढू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा


Weather Updates : फेब्रुवारी महिन्यातच पारा वाढला, भीषण गरमीचे संकेत; कसा असेल मे-जून महिना?