Uddhav Thackeray in Nagpur :  कारगिल युद्धात भारतीय सैन्याने विजय मिळवल्यानंतर भाजपने लष्करप्रमुखांचे, जवानांचे फोटो वापरून पक्षाचा प्रचार केला होता. याबद्दलची तक्रार तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे करण्यात  आली होती. त्यांनी याची दखल घेत तशाप्रकारचे बॅनर हटवले. आताचे पंतप्रधान असते तर त्यांनी लष्करप्रमुखांनाच तुरुंगात डांबले असते अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली. नागपूर येथील महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेत बोलत होते.
 
नागपूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर तुफान हल्ला चढवला. आनंदाचा शिधा वेळेवर पोहचला नाही. त्याला बुरशी लागत असल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या कारभारालाच बुरशी लागली असून त्यातून शिधा तरी कसा सुटणार, असा बोचरा सवालही त्यांनी केला. 


वणवण फिरलं म्हणजे खूप काम केलं असं नाही


उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. कोरोना काळात मी घरातून काम केले. त्यावरून विरोधक टीका करत असतात. मी घरातून काम केलं तरी लोकांच्या सहकार्याने आपण कोरोनाचा मुकाबला केला. काम करायची इच्छा असेल तर कुठूनही करता येते. वणवण फिरले म्हणजे खूप काम केलं असं नसते अशा कानपिचक्याही उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 


शेतकऱ्यांचा आक्रोश अन् मुख्यमंत्री देवदर्शनाला....


राज्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असताना मुख्यमंत्री हे देवदर्शनाला गेले. पंचनामा करायला अधिकारी जात नव्हते, असेही उद्धव यांनी म्हटले.  
शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे जर रामभक्त असते तर सूरतला, गुवाहाटीला पळाले नसते. हे सगळेजण अयोध्येला गेले असते, असा टोला त्यांनी लगावला. 


कोर्टाच्या निर्णयानंतर टिकोजीराव फणा काढून बसले 


उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना अयोध्येला मी गेलो होतो. त्यावेळी संजय राऊत सोबत होते अन् काँग्रेसचे नेते सुनील केदारदेखील सोबत होते, अशी आठवण उद्धव यांनी सांगितली. राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. त्यावेळी आम्ही सातत्याने राम मंदिरासाठी कायदा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोदी सरकारकडून कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. राम मंदिराच्या कायद्याबाबत शांत बसले होते. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी टिकोजीराव फणा काढून बसले असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.