Naxal Movement : दिल्लीत झालेले ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शिरकाव केला असल्याची कबुली माओवाद्यांनी दिली आहे. माओवाद्यांच्या केंद्रीस समितीच्या दस्ताऐवजात ही बाब नमूद करण्यात आली आहे. माओवाद्यांनी एक 22 पानी पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेत माओवाद्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव वाढवण्याची रणनीती आखली असल्याचे स्पष्ट होत आहे. माओवाद्यांनी 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना, समर्थकांना केले आहे. माओवाद्यांनी काही राज्यांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू केल्याचे या दस्ताऐवजातून समोर आले आहे.
शेतकरी आंदोलनात शिरकाव
माओवाद्यांनी देशांतील काही आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कृषी कायद्याविरोधात झालेले शेतकरी आंदोलनाचाही समावेश आहे. या कृषी कायदाविरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवण्यात आला. या सहभागामुळे आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले असल्याचे माओवाद्यांनी म्हटले. त्याशिवाय, अग्निवीर योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही सहभाग नोंदवला असल्याचे माओवाद्यांच्या दस्ताऐवजात नमूद करण्यात आले आहे. लोकांच्या आंदोलनात रणनीती आखून सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहनही माओवाद्यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांवरही माओवाद्यांनी टीका केली आहे. माओवाद्यांनी आपल्या दस्ताऐवजात धार्मिक अल्पसंख्यकांवर विशेषत: मुस्लिम, ख्रिश्चनांवर लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले. त्यांच्यासह आदिवासी, दलित, महिला, विद्यार्थी-बुद्धीजीवी वर्गावर दडपशाही सुरू असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना 'अर्बन नक्षल' म्हणून शिक्का मारून त्यांचा छळ सुरू आहे. या सगळ्याला विरोध आंदोलने करण्यात आली असल्याचे माओवाद्यांनी म्हटले. ज्या ठिकाणी ताकद नाही अशा ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आला होता. तर, ज्या ठिकाणी माओवादी पक्ष मजबूत आहे, त्याठिकाणी नेतृत्व केले असल्याचे माओवाद्यांनी आपल्या दस्ताऐवजात म्हटले आहे.
या राज्यात प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न
सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने देशातील शहरी भागांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या राज्यांतील शहरी भागात माओवादी आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राज्यातील शहरी भागात गनिमी काव्याने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन माओवाद्यांनी आपल्या दस्ताऐवजात केले आहे. बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमधील अनेक शहरी भागातही माओवाद्यांकडून प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. नक्षल कारवाया आणि प्रभाव वाढवण्यासाठी मोठी योजना आखण्यात आल्याचे दस्ताऐवजात दिसून येत आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी अभियान सुरू असलेल्या ग्रामीण भागातदेखील प्रभाव वाढवण्यास यश आले असल्याचे माओवाद्यांनी आपल्या दस्ताऐवजात दावा केला आहे.