नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांचं धाडस कितपत वाढलं आहे, याचा अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकार नागपुरात पाहायला मिळाला आहे. आयसीयूमध्ये दाखल अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले आणि त्या रेमडेसिवीरचा काळाबाजार केला.


नागपुरातील जामठा परिसरातील 'कोविडालय' नावाच्या रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या पुरुष नर्सला आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन दिले होते. मात्र, दिनेश गायकवाडने (आरोपी पुरुष नर्स) तीनपैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याकडे ठेवले आणि त्याऐवजी अत्यवस्थ रुग्णाला चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले. त्यानंतर रुग्णालयातील रेकॉर्डवर संबंधित रुग्णाला विशिष्ट कालावधीत तीन रेमडेसिवीर इंजेक्शन टोचल्याची नोंद केली.


दिनेश गायकवाडने चोरलेले दोन्ही इंजेक्शन्स नागपुरातील घरी (तो इतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शेयरिंगमध्ये राहतो) आणून ठेवले. मात्र, दोन दिवसांनी हे इंजेक्शन त्याचा रुम पार्टनर असलेल्या आणि एका दुसऱ्या रुग्णालयात वॉर्डबॉय असलेल्या शुभम पानतावणे नावाच्या मित्राने चोरले. शुभम त्याच्या प्रणय येरपुडे आणि मनमोहन मदन नावाच्या इतर मित्रांच्या मदतीने एका इंजेक्शन 35 हजार रुपये दराने काळाबाजारी करताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी जेव्हा शुभम पानतावणेची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने हे इंजेक्शन दिनेश गायकवाड याच्या कपाटामधून चोरल्याचे सांगितले. 


पोलिसांनी दिनेश गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हे इंजेक्शन 'कोविडालय' या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका अत्यवस्थ रुग्णासाठीचे असून त्याला रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन लावल्याचे दिनेश गायकवाडने पोलिसांना सांगितले.


सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दिनेश गायकवाड, शुभम पानतावणे, प्रणय येरपुडे, मनमोहन मदन या चार आरोपींसह एका महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. ही महिला डॉक्टर एका तिसऱ्या रुग्णालयाची असून ती हे इंजेक्शन पुढे काळाबाजार करुन विकण्यात मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.


दरम्यान, कोविडालय या रुग्णालयातील आयसीयूमध्ये अत्यवस्थ असलेला आणि रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन लावण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. आता तो कोरोनामुक्त होऊन घरी असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.