नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज काँग्रेस पक्षाचे अभिजीत वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजीत वंजारी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार असल्याचा दावा यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची तसेच नागपूर शहरातील स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती खटकणारी होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त माजी मंत्री रमेश बंग अखेरच्या क्षणी उपस्थित झाले होते. तर शिवसेनेकडून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने अर्ज दाखल करताना उपस्थित होते.


आघाडीमध्ये कोणताही बेबनाव नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते या ठिकाणी उपस्थित नसले, तरी राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग उपस्थित असल्याचा दाखला देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आम्ही बसून गुंता सोडवू असे सूचक वक्तव्य केले. तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या अनुपस्थितीला फारसं महत्त्व न देता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी निश्चितच निवडणूक जिंकतील असा दावा केला. "आम्ही सर्व मंत्री विदर्भात तळ ठोकून राहू, पूर्ण जोर लावू आणि भाजपला पराभूत करु, पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड आहे हे गैरसमज दूर करु," असा दावा ही विजय वडेट्टीवार यांनी केला.


काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी आज सकाळी दहा वाजता सुमारे 300 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जीपीओ चौकातून हाकेच्या अंतरावर असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एक छोटी रॅली काढली आणि काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.


यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदार यादी रद्द ठरुन नवी मतदार यादी तयार करण्यात आली आहे.. काँग्रेस पक्षाने नव्या मतदार यादीत तरुणाच्या नोंदणीसाठी सुरुवातीपासून लक्ष घातले आहे. त्यामुळे यावेळीभाजपचा गड मानला जाणारा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ काँग्रेस जिंकेल, असा दावा ही बहुतांश काँग्रेस नेत्यांनी केला.


दरम्यान, अभिजीत वंजारी यांची रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोरुन निघाली. पण त्यात नागूपर शहरातला राष्ट्रवादीचा एकही नेता सहभागी न झाल्याने या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकवाक्यता नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


Maharashtra Graduate Constituency Election | नागपूरमधून काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांना उमेदवारी