फिलिपाईन्सप्रमाणे आपल्या देशातही हवेत चालणारी डबल डेकर बस आणू : नितीन गडकरी
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2019 07:12 PM (IST)
फिलिपाईन्स या देशात हवेत चालणारी डबल डेकर बस सेवा आहे, तशीच बससेवा भारतात उपलब्ध करुन देण्यासाठी माझ्या खात्याने सामंजस्य(memorandum of understanding)करार केला आहे : नितीन गडकरी
नागपूर : फिलिपाईन्स या देशात हवेत चालणारी डबल डेकर बस सेवा आहे, तशीच बससेवा भारतात उपलब्ध करुन देण्यासाठी माझ्या खात्याने सामंजस्य(memorandum of understanding)करार केला आहे. त्यानुसार आम्ही उत्तराखंडमध्ये पाच ठिकाणी अशी बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. आज नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरच्या 'माझी मेट्रो'चे उद्घाटन करण्यात आले. मोदींनी दिल्लीतूनच मेट्रोचे उद्घाटन केले. नागपूरमध्ये उदघाटनाच्या कार्यक्रमाला गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, हवेत चालणारी बस फिलिपाईन्स या देशात आहे. अशी बस सेवा भारतात उत्तराखंडमध्ये सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी बस सेवा नागपुरात कशी आणता येईल, यासाठी आम्ही अभ्यास करु. गडकरी म्हणाले की, आज नागपूर मेट्रोचे उद्घाटन होत आहे. हे केवळ नागपूर मेट्रोचे उद्घाटन नसून 21 व्या शतकातील नागपूरची सुरुवात आहे.