नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षातून भाजपमध्ये आलेले नेते भाजपची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, असं भाकित नितीन गडकरी यांनी वर्तवलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते.


काळाच्या ओघात पक्ष विस्तार करायचा असतो तेव्हा माणसं जोडावी लागतात. नागपूर भाजपमध्येही अनेकजण काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यावेळी काँग्रेस पक्ष मोठा होता. मात्र बाहेरुन भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली, त्याप्रमाणे ते वागले, असं नितीन गडकरींनी सांगितलं.



जनतेने राज ठाकरेंचा विचार करावा - नितीन गडकरी


नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत. लोक त्यांना प्रतिसादही देतात. मात्र त्यांच्या पक्षाची राजकीय रणनिती चुकली आहे. राजकारणात सत्ताधारी पक्षाचा विजय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच ताकदवान विरोधी पक्ष असणे गरजेचं असतं, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.


सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यामुळे लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोध पक्षही महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांना विरोधी पक्षात बसण्याची इच्छा आहे ही चागंली गोष्ट आहे. जनतेने त्यांचा विचार करायला हवा, असं सूचक वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी केलं.