नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्यामुळे अलीकडेच अटकेची  कारवाई झालेले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूर विद्यापीठाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer savarkar) यांचा पुतळा जाळण्यात आला होता. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने कुणाल राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजयुमोकडून करण्यात आली आहे. त्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागपूर विद्यापीठातील कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासन कुणाल राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार का, हे पाहावे लागेल.


काही दिवसांपूर्वी कुणाल राऊत यांनी नागपूर विद्यापीठाच्या परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला होता. त्यानंतर कुणाल राऊत यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने कुणाल राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्याच्यादृष्टीने काहीही हालचाली केल्या नव्हत्या. विद्यापीठ प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे आम्हाला ठिय्या आंदोलन करावे लागत असल्याची प्रतिक्रियी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर नागपूर पोलीस विद्यापीठाच्या आवारात पोहोचले आहेत. आम्ही कुणाल राऊत यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाल्याची प्रत घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजयुमोने घेतली आहे.


तत्पूर्वी कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्सला काळे फासल्याप्रकरणी अटक केली होती. भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. त्यावर 'मोदी की गॅरंटी' असा उल्लेख होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वत:ची प्रसिद्धी करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून करण्यात आला होता. याविरोधात कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


 


आणखी वाचा


युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी नागपूर पोलिसांची कारवाई