नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात डान्स बारला परवानगी नसताना काही ठिकाणी राजरोसपणे डान्स बार सुरु असल्याचं समोर आलं आहे.


डान्स बारमध्ये डान्स करणाऱ्या महिला डान्सर्ससोबत अश्लील वर्तन सुरु असल्याचंही समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात "बारबीलो" या बारमध्ये नियमबाह्य पद्धतीने डान्स बार सुरु असल्याचे समोर आलं आहे. या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून महिला डान्सर्सवर नोटा उधळल्या जात आहेत. हा सगळा प्रकार बारमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.


बारबीलो बारचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. बारच्या आत काही लोक बेभान होऊन डान्स करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बोलावलेल्या महिलांवर हे सर्व लोक नोटा उधळतान दिसत आहे. यापैकी काही जण या महिला डान्सर्सकवर बळजबरी करण्याच्या प्रयत्न करतानाही दिसत आहेत.



नागपूर जिल्ह्यात एकाही बारला डान्स बार श्रेणीची परवानगी नाही. फक्त ऑर्केस्ट्रा म्हणजेच गाण्याच्या कार्यक्रमाची परवानगी आहे. नियमानुसार डान्स आणि बारची जागा वेगवेगळी असावी. एक लोखंडी कडा बनवून त्याच्या बंदिस्त क्षेत्राच्या आत महिला गायकाला ठेऊन कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.


मात्र, ग्रामीण भागात अनेक बारमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसवून कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे समोर आलं आहे. बुटीबोरी परिसरातील या सीसीटीव्ही फुटेजमुळे तर असे बार महिलांवर अत्याचार करण्याचे ठिकाण बनत चालल्याचे, अश्लीलता पसरविणारे अड्डे बनल्याचे समोर आलं आहे. आता खुद्द नागपूरचे पालकमंत्री असलेले आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे अशा बारविरोधात काय कारवाई करतात, हे पाहवं लागेल.