नागपूर : नागपूरमध्ये गेल्या पाच दिवसात उष्माघाताने तब्बल 16 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  या सर्वांचा मृत्यू रस्त्यावरच झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत नेमकी स्पष्टता येणार आहे.

विदर्भात यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला. गेल्या महिन्याभरात नागपूर, चंद्रपूर, अकोला भागात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे विदर्भवासियांना मोठा फटका बसला आहे. मान्सून लांबणीवर पडल्याने कोणताही दिलासा नागपूरकरांना मिळत नाही. यातच ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. फक्त नागपूरमध्ये गेल्या पाच दिवसात 16 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.



गेल्या पाच दिवसांपासून नागपूरचा पारा 45 अंशांपार पोहोचला आहे. त्यामुळे हे सर्व 16 मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता आहे. उष्माघाताने झालेल्या मृत्यूंची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली जात असल्याने पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिकृत माहिती मिळणार आहे.