नागपूर : पुरस्कार सोहळ्यात मंचावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला. यावरुन साहित्य विश्वात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. यावर आता खुद्द यशवंत मनोहर यांनीच आपली बाजू सांगितली आहे. "एखाद्या पुरस्कारासाठी मी आयुष्यभर जपलेले विचार (इहवादी विचार), माझे लेखन, माझी मूल्ये जुगारावर लावू शकत नाही, म्हणून पुरस्कार नाकारला," असं यशवंत मनोहर म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला.
यशवंत मनोहर म्हणाले की, " मझी आजवरची लेखक म्हणून भूमिका, माझी इहवादी भूमिका, माझी प्रतिमा ही विदर्भ साहित्य संघाला माहित असेल असा माझा समज होता. पुरस्कार देताना नेपथ्य कसे असेल, स्टेजवर काय काय असेल याबाबत मी विदर्भ साहित्य संघाला विचारणा केली होती. त्यांनी स्टेजवर सरस्वती देवीची प्रतिमा असेल असं सांगितलं. मला माझी मूल्ये नाकारुन हा पुरस्कार स्वीकारणे शक्य नव्हते, म्हणून मी नम्रपणे पुरस्कार नाकारला."
सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा नाकारला पुरस्कार
"एखाद्या पुरस्कारासाठी मी आयुष्यभर जपलेले विचार (इहवादी विचार), माझे लेखन, माझी मूल्य जुगारावर लावू शकत नाही, म्हणून पुरस्कार नाकारला," असं मनोहर यशवंत यांनी नमूद केलं. "जर गेल्या काही दिवसात विदर्भ साहित्य संघातून कोणी संपर्क साधला असता तर यातून मार्ग काढता आला असता, मात्र तसं काही झालं नाही," असा दावाही यशवंत मनोहर यांनी केला.
मला स्त्री शिक्षण क्षेत्रात, स्त्री मुक्ती चळवळीत सावित्रीबाई फुले आणि इतर अनेक स्त्रियांचे योगदान माहित आहे. तुम्ही मला या बाबतीत सरस्वतीचे योगदान सांगा. जर तुम्ही मला ते पटवून दिले तर मी माझ्या भूमिकेबद्दल विचार करेन, असंही यशवंत मनोहर म्हणाले.
वाङमयीन कार्यक्रमात स्टेजवर लोकहितवादी, मुक्तीबोध, पु.ल., कुसुमाग्रज, केशवसुत, डॉ पाटणकर आणि इतर अनेक दिग्गज साहित्यिकांचे - विचारवंतांचे फोटो का ठेवता येऊ शकत नाही? वाटल्यास ज्या संविधानाला आपण मानतो, पाळतो, त्या संविधानाची प्रत धार्मिक फोटोऐवजी ठेवता येऊ शकत नाही का? असे सवालही त्यांनी विचारले.
माझं सर्व साहित्यिक, सर्व लेखक, कवी, कलावंत, सर्व राजकारणी, महाराष्ट्र शासन यांना विनंती आहे की, अशा साहित्यिक, शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमातून सरस्वतीचे फोटो, वंदना हे करण्याऐवजी सावित्रीचे फोटो, संविधानाची प्रत ठेवता येते का याचा विचार करावा, असा सल्लाही यशवंत मनोहर यांनी दिला.