Chandrashekhar Bawankule : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचं समर्थन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करणार नाहीत, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, असं आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलं. ते नागपुरात (Nagpur) एबीपी माझासोबत बोलत होते.


आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी (7 फेब्रुवारी) औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता. तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. शिंदे गटाच्या आमदाराने दगडफेक केल्याचा आरोप दानवे यांनी केला. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांनी सांगितले की दगडफेक झाली आणि शिंदे गटाच्या आमदाराने ही दगडफेक केल्याचा आरोप आहे. पोलीस हे तपासून पाहतीलच. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी समर्थन करणार नाहीत, मग ते आदित्य असो वा कोणी. कोणाच्याही ताफ्यावर दगडफेक करणे योग्य नाही. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील."


यासोबतच बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. राज्यपाल बदलाचे अधिकार ना मला आहेत, ना आदित्य ठाकरेंना. तो केंद्रीय व्यवस्थेचा विषय आहे. आदित्य ठाकरे मोठे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल 


संजय राऊत यांना दोन चष्मे आहेत. एका चष्म्यातून पाहिले तर त्यांना सर्व हिरवं रान दिसतं आणि दुसऱ्या चष्म्यातून त्यांना हिरवं असलेल्या रानातही कोरडा दुष्काळ दिसतो. एका चष्म्यातून ते उद्धव ठाकरे, शरद पवार, महाविकास आघाडी यांच्या उपक्रमांना पाहतात तर दुसऱ्या संदर्भात त्यांना कोरडा दुष्काळ दिसतो. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांची सभा मोठी झाली. खुर्च्या उचलाव्या लागल्या नाहीत. चांगलं समर्थन एकनाथ शिंदे यांना मिळालं," असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.


2024 मध्ये पक्षप्रवेशाचा बॉम्ब ब्लास्ट, मविआ उमेदवार मिळणार नाही


भाजपमध्ये वेगवेगळे अभियान राबवतो. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत. आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्ष वाढवण्याचा काम करत आहोत. मातीच्या घरी कोणी राहायला तयार नाहीत म्हणून लोक आमच्याकडे राहायला येतात. आम्ही त्यांना थांबवत नाही. आम्ही मात्र कोणाच्या घरात जात नाही. आम्ही कोणालाही ऑफर देणार नाही. आमच्या पक्षात या, असा निमंत्रण देणार नाही. मात्र भाजपमध्ये कोणीही आला तर त्यांचं स्वागत करु. त्यांच्या पक्षात जेवढा सन्मान आहे त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये देऊ. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. येणाऱ्या काही दिवसात असे पक्षप्रवेश होत राहणार आहेत. 2024 मध्ये एवढे पक्षप्रवेशाचा बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवार मिळणार नाही. दहा तारखेला ठाण्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होणार आहेत.


ही महाराष्ट्राची संस्कृती, पटेल यांच्या फडणवीसांच्या हजेरीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावर चंद्रशेअर बावनकुळे म्हणाले की, "ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवारांच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही गेले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमात फडणवीस गेले आहेत आणि जाणारही आहेत. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहेत." "सकाळचा नऊ वाजताचा भोंगा बंद झाला तर ही संस्कृती नक्कीच जगता येईल, असा टोला त्यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला. तसंच शरद पवार विदर्भात येत आहेत. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. दौरा करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र सर्वांसाठी खुला आहे, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.


'बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला कधीच संपर्क केलेला नाही'


बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवर मी त्यांची भेट घेणं योग्य नाही. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेबांची नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हेही मला माहित नाही. मी त्यांना काल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र त्यांचा फोन बंद होता. नाराजीचं कारण नाना पटोले यांनाच माहित आहे. बाळासाहेब थोरात यांनी कधीच आम्हाला संपर्क केलेला नाही. आयुष्याची चाळीस वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतली आहे. या गोष्टीचं वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या विधीमंडळात नऊ वेळा निवडून गेले ते नेते आहेत, सहकार क्षेत्रात मोठे काम केले आहेत आणि अशा नेत्याला पक्षात नाराज व्हावं लागतं हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. भाजपमध्ये अशी नाराजी दिसली तर आम्ही लगेच दाखल घेतो, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


VIDEO : Chandrashekhar Bawankule On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागतात