Nagpur News : नागपुरातील (Napgur) बहुचर्चित निखिल मेश्राम हत्येप्रकरणी (Nikhil Meshram) सात आरोपींना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2018 मधील हे प्रकरण आहे. प्रेम प्रकरणात उद्भवलेल्या वादातून आरोपींनी प्रियकराचा भाऊ निखिल मेश्राम याची हत्या केली होती. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 12 आरोपींपैकी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुरव्यांअभावी पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी शिक्षा असल्याचं म्हटलं जात आहे.


अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड अन्‌ दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या सातही आरोपींवर मुलीच्या प्रियकराचा भाऊ निखिल दिगांबर मेश्राम याची हत्या केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.  शंकर नथ्थुजी सोळंकी, देवीलाल उर्फ देवा नथ्थुजी सोळंकी, सूरज चेतन राठोड, रमेश नथ्थुलाल सोळंकी, यश उर्फ गुड्डू हरीश लखानी, मिखन नथ्थूलाल सलाद आणि मीना नथ्थूलाल सलाद अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांनी निर्णय दिला. 


प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादतून प्रियकराच्या भावाची हत्या


संबंधित घटना 20 मे 2018 रोजी शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. किरण ऊर्फ विक्की मेश्राम याचे आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये राग होता. याच वादातून घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 मे 2018 रोजी आरोपींनी किरण मेश्रामसह त्याच्या आईला  मारहाण करुन जखमी केले. यानंतर किरणने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी किरण आणि त्याचा भाऊ निखिल मेश्राम यांच्यावर दबाव टाकला होता.


परंतु किरण मेश्रामने तक्रार मागे घेण्यासाठी नकार दिल्याचा राग आरोपींच्या मनात होता. 20 मे 2018 रोजी किरण आणि निखिल घरासमोर बसलेले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी किरण आणि निखिलच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने हल्ला करुन दोघांनाही जखमी केले. यात निखिलच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला मेयो रुग्णालयात दाखल केलं असतान डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.


अलिकडच्या काळातील सर्वात मोठी शिक्षा


या प्रकरणात एकूण 24 आरोपी होते. त्यापैकी 12 जणांना अटक करण्यात आली. उर्वरित 12 जणांपैकी आठ जण हे विधिसंघर्ष बालक होते तर चार आरोपी महिला फरार आहेत. 12 आरोपींवर खटला चालवण्यात आला. त्यात 17 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. 12 पैकी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर पाच जणांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आलं. विशेष म्हणजे एकाच वेळी सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही अलिकडच्या काळातील मोठी घटना आहे.