नागपूर : नागपूरमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये शनिवारी (7 ऑगस्ट) बंद ठेवण्याचे आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. शिवाय नदी-नाल्यांच्या किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका, आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ व एनडीआरएफ यासह सर्व यंत्रणांना अतिसतर्क राहण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


नागपुरात आज दुपारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणीचपाणी झालं होतं. अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचलं होतं. जून, जुलैमध्ये पावसाने नागपूरकडे पाठ फिरवली होती, मात्र 15 ऑगस्टनंतर आज नागपुरात दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे तळ गाठलेली विविध धरणं आणि तलावात पाणी वाढायला सुरुवात झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी होणारा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपूरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच हवामान विभागाने येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


नागपूरात शनिवारी पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यानचा 11 किलोमीटरच्या रिच 3 च्या टप्प्यातील प्रवासी सेवेचे उदघाटन करणार होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी सुभाषनगर मेट्रो स्टेशनवरून सीताबर्डी दरम्यान मेट्रोवारीही करणार होते. संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी हे मानकापूर क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मेट्रोसह इतर अनेक प्रकल्पांशी संबंधित उद्घाटन करणार होते.


मात्र, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. उद्यादेखील नागपुरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. उद्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.