अमरावती/अकोला : गेल्या काही दिवसांपासून सूर्य राज्यात विषेशत: विदर्भात आग ओकतोय. अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमधील एक शहर ठरत आहे. 27 एप्रिलला अकोल्याचा पारा 46.7 अंशावर गेला होता. तापमान एवढं वाढलं आहे की, ऑम्लेट आणि डोसा बनवण्यासाठी गॅस किंवा स्टोव्हचीही गरज लागत नसल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.


अकोल्यातील गीतानगर भागातील सत्यभामा गवळे आणि वर्षा पोहरे या दोन मैत्रिणींनी तापत्या उन्हात गॅसशिवाय डोसा बनवला आहे. सकाळी 11 वाजता त्यांनी टेरेसवर डोस्याचं पीठ एका भांड्यात पसरवलं. तीन तासांनंतर त्यांनी टेरेसवर जाऊन परिस्थिती पाहिली, तर चक्क डोसा तयार झाला होता. यावरुन उन्हाची तीव्रता लक्षात येऊ शकते.



दुसरीकडे अमरावतीतही अशीच परिस्थिती आहे. अमरावतीत उन्हाचा पारा 45 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. अशात लोक नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. तापलेल्या उन्हात घराच्या बाहेरील फर्शीवर अवघ्या 10 मिनिटात ऑम्लेट तयार करण्याचा प्रताप अमरावतीत करण्यात आला आहे. तर दोन मिनिटात बाहेर ठेवलेल्या तव्यावर चपातीही तयार होत आहे.


गमतीचा भाग सोडला तर, विदर्भातील सध्याची परिस्थिती काय आहे, किती उष्णता याठिकाणी आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळे येथील नागरिक देखील कामाव्यतिरिक्त बाहेर पडताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांत येथील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या तापमानाची दखल घेत हवामान विभागानेही पुढील तीन दिवस विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.