नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेल्या तीन-चार दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान खात्याने विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर केले आहे. 30 एप्रिलपर्यंत विदर्भात सर्वच ठिकाणी तापमान उच्चांकी पातळीवर राहील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, अवघ्या 6 दिवसात तापमानात 6 अंशांची वाढ झाल्याने नागपूरकर पुरते बेजार झाले आहे.


हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात 26 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत ऑरेंज अलर्ट म्हणजेच उष्णतेची लाट जाहीर केली आहे. विशेष म्हणजे तापमान जेव्हा सामान्यांपेक्षा 4 ते 5 अंशानी जास्त राहते किंवा सलग 45 अंशांच्या वर राहते तेव्हा हे ऑरेंज अलर्ट जारी केले जाते.


सकाळी लवकर कामे आटपून दिवसभर घरात किंवा कार्यालयात राहणे. अतिशय जास्त गरजेच्या कामांसाठीच बाहेर पडणे, असा पवित्रा नागपूरकरांनी घेतला आहे. नागपूरकर असं सामान्यपणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात स्वीकारतात. मात्र, यंदा नागपुरात मे महिन्यातील चित्र यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटीच दिसू लागले आहे.


नागपुरात गेल्या 6 दिवसातील तापमानातील वाढ


21 एप्रिल - 39.4 अंश सेल्सियस
22 एप्रिल - 41.4 अंश सेल्सियस
23 एप्रिल - 42.5 अंश सेल्सियस
24 एप्रिल - 43.4 अंश सेल्सियस
25 एप्रिल - 44.3 अंश सेल्सियस
26 एप्रिल - 45.3 अंश सेल्सियस


अकोल्यात उष्णाघाताने एकाचा मृत्यू


अकोल्याचं तापमान 46.4 अंशांवर गेलं आहे. आज अकोल्यात शेषराव नामदेव जवरे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात शेषरावचा मृतदेह आढळून आला. उष्मघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


गेले दोन दिवसांपासून अकोल्याचे तापमान 46 अंशांच्या वर आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर आणि ब्रम्हपुरी या ठिकाणी ही तापमान 45 अंशांच्या वर आहे. इतर ठिकाणी तापमान 44 अंशांच्या घरात असल्याने संपूर्ण विदर्भाचं सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे.