नागपूर : सायबर हॅकर्स आता खास व्हायरसच्या मदतीने महिला आणि तरुणींच्या स्मार्ट फोनची गॅलरी सहज हॅक करु शकणार आहेत. शिवाय कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे महिलांच्या खाजगी क्षणातले फोटो त्यांना न कळता मिळवू शकणार आहे. त्यामुळे तरुणी आणि महिलानी स्मार्ट फोन वापरताना सावध राहणे गरजेचे बनले आहेत. तसेच गॅलरीला सुरक्षित पासवर्ड देणे, योग्य अँटी व्हायरस ठेवणे गरजेचे बनले आहे. याबद्दलच्या सूचना नागपूर पोलिसांनी दिल्या आहेत.


नागपुरात फ्रेंड्स गार्मेंट्स या कपड्यांच्या शोरुममधील ट्रायल रुम मध्ये छुप्या कॅमेऱ्याने तरुणींच्या चित्रीकरणाची घटना घडल्यानंतर नागपूर पोलीस दलातील महिला अधिकारी मैदानात उतरल्या आहेत. शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना अशा गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी नागपूर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी "जागरूक मी व समाज" अशी मोहीम सुरु केली आहे.

सोमवारी नागपूर पोलीस या मोहीमेअंतर्गत वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थिनीसोबत संवाद साधत आहे. त्यांना नव्या गेजेट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर करताना काय सावधगिरी बाळगावी याचे प्रशिक्षण देत आहे.

नागपूरच्या महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनी आणि महिलांना जागृत करताना सायबर सेलच्या प्रमुख डीसीपी श्वेता खेडेकर यांनी सांगितले की हॅकर्सनी आता लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये डोकावू शकत आहेत. एखाद्या मालवेयर/वायरसने एखाद्याच्या स्मार्ट फोनची गॅलरी ताब्यात घेऊन त्यातील फोटोंचा गैरवापर करणे किंवा कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे तुम्हाला न कळत तुमच्या स्मार्ट फोनद्वारे तुमच्या खाजगी आयुष्याचे फोटो क्लिक करणे ही हॅकर्स ना शक्यता झाले आहे. त्यामुळे स्मार्ट फोन वापरताना तरुणींनी खास दक्ष राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.