नागपूर : नागपूरचा जावई सध्या नागपुरात शूटिंग करत आहे. हा जावई म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून चक्क महानायक अमिताभ बच्चन आहे. नागराज मंजुळेंच्या 'झुंड' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी 45 दिवसांचं शेड्युल नागपुरात पार पडत आहे.
अमिताभ बच्चन नागपूरचे जावई कसे? असा सवाल कोणाच्याही मनात येईल. बिग बींच्या पत्नी अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणजे पूर्वाश्रमीच्या जया भादुरी. त्यांचे वडील तरुण कुमार नागपुरात रिपोर्टर होते. जया भादुरी यांचं प्राथमिक शिक्षण नागपुरातील विद्यासागर शाळेत झालं. नागुपरातील मुखर्जी कुटुंबीयांशी त्यांचं असलेलं नातं आजही कायम आहे.
सध्या नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटाचं शूटिंग नागपुरात सुरु आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला गेला आहे. 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान', कौन बनेगा करोडपती यासारखे प्रोजेक्ट संपल्यानंतर बिग बीनं आपल्या तारखा 'झुंड' सिनेमासाठी दिल्या आहेत.
अमिताभची 'एक झलक' पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. मोहननगर भागात 24 तास चाहत्यांची 'झुंड' पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बच्चन कुटुंबीयांची नाळ पुन्हा एकदा नागपूरशी जोडली गेली.