नागपूर : नागपुरात एका चार वर्षीय बालिकेवर बलात्काराची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना नागपूर-अमरावती रोडवरील एका प्राथमिक शाळेच्या आवारात घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित बालिकेची आई काचीमेट परिसरातील इमारतींमध्ये धुनी भांडी करण्याचा काम करते. लोकांच्या घरी काम करत असताना ती आपल्या चार वर्षीय मुलीला परिसरात खेळायला सोडते. सध्या परिसरातील खाजगी प्राथमिक शाळेला सुट्टी असल्याने परिसरातील सर्व मुले शाळेच्या आवारात खेळतात.

काल दुपारी पीडित मुलगी शाळेच्या आवारात खेळत असताना आरोपी भूषण डहाट याने पीडित मुलीला एका खोलीत नेत तिला अश्लील चित्रफीत दाखविली. त्यानंतर भूषणने त्या मुलीसोबत अतिप्रसंग केला.

संध्याकाळी पीडित मुलीच्या कपड्यांवर काही खुणा पाहिल्यानंतर शंका आल्यामुळे तिच्या आईने मुलीला सविस्तर विचारणा केली. तेव्हा भूषण डहाट याने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे समोर आले.

पीडित मुलीच्या आईने लगेच आरोपी भूषण डहाटला फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी फोन बंद करून फरार झाला आहे.  आज सकाळी पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

घटनेची चौकशी आणि मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि लहान मुलांचा लैंगिक छळ असा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपी भूषण डहाट संबंधित खाजगी शाळेच्या महिला शिपायाचा नातेवाईक असून त्याच कारणामुळे तो शाळेच्या आवारात शाळा प्रशासनाने दिलेल्या खोलीत राहत होता.