Nagpur Railway Time Table : दाट धुक्याने सर्वत्र चादर पांघरल्यामुळे रेल्वे सेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे नागपूरहून (Nagpur) धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून थंडीचा पारा घसरतच चालला आहे. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे.


परिणामी नागपूर मार्गे येणे-जाणे करणाऱ्या तब्बल 33 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला असून, या गाड्यांपैकी कोणती गाडी, एक तास, कोणती दोन तर कोणती गाडी चक्क सहा तास विलंबाने धावत आहे. रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने गाड्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशात प्रतीक्षालयात जागा कमी पडू लागल्याने अनेक प्रवासी रेल्वेस्थानकाच्या विविध फलाटावर, रेल्वेस्थानकाच्या परिसरात जागा मिळेल तेथे दाटीवाटीने बसलेले आढळत आहेत. रेल्वेस्थानकासोबतच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या प्रवेशद्वार परिसरातही मोठ्या संख्येत प्रवासी दिसून येत आहेत.


परिसरातील मोठी गर्दी


विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी रेल्वेस्थानकाच्या आतमधील स्टॉल्स, कॅन्टीन तसेच बाहेर असलेली भोजनालये, हॉटेल्स, चहा टपऱ्यांवरही मोठी गर्दी बघायला मिळत आहे. थंडीचा कडाका असल्याने गरम खाद्यपदार्थ, चहा, कॉफीची मोठी मागणी वाढली आहे.


राज्यातही पारा पुन्हा घसरणार


राज्यातील काही भागात थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठला आहे. राजधानी दिल्लीत थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. किमान तापमान 5 अंशांवर गेले असून दृश्यमान्यता (Visibility) पन्नास मीटरपेक्षाही कमी आहे. पुढील दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील  काही जिल्ह्यात थंडीची लाट येऊ शकते. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.


ही बातमी देखील वाचा...


नायलॉन मांजा विक्रेत्यांवर मोक्का लावा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; 'आप'चे पोलीस उपायुक्तांना निवेदन