AAP Nagpur News : नायलॉन मांजामुळे (Banned nylon manja) मुलांना रुग्णालयात भरती करण्याच्या दोन घटना नाशिक शहरात गेल्या तीन दिवसातघडल्या आहेत.  त्यामुळे या जीवघेण्या मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन आप पार्टीने परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांना (Nagpur Police) दिलेय. 


दरवर्षी प्रमाणे आपल्या नागपूर शहरात जीवघेण्या नायलॉन मांजा विक्री व तो मांजा खरेदी करण्याचे सत्र येत्या मकसंक्रांती समोर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. प्रशासनाकडून नायलॉन बंदीच्या नावावर फक्त कागदी कारवाई करण्यात येते. काहींची धरपकड करण्यात येत असल्याचा आरोपही आपकडून करण्यात आला.


नायलॉन मांजा बंदीसाठी नायलॉन मांजा निर्मिती करणारे, विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यावर करणार्‍या कडक 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच वारंवार असे कृत्य करणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. आपच्या शिष्टमंडळात मध्य नागपूर अध्यक्ष लक्ष्मीकांत दांडेकर, मध्य नागपूर प्रभारी कृतल आकरे, विशाखा दुपारे, संगीता बातो, गिरीश तीतरमारे, विनोद गौर, पियुष आकरे, प्रेमलाल खोटे, अमर बातो यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


तरुणाला लागले 16 टाके


सोमवारी सायंकाळी राणी दुर्गावती चौक परिसरात घडली. या घटनेत एका 18 वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा गळा कापला गेला. यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करून 16 टाके घालावे लागले. या दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्याचे नाव शाहनवाज हुसैन मलिक असे असून ती ताजनगर येथील रहिवासी आहे. उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती चौकातून सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास तो सायकलने आपल्या वडिलांच्या दुकानात जात असताना अचानकपणे मांजा आडवा आल्याने त्याचा गळा कापला गेला. यामुळे रक्तबंबाळ होऊन तो विव्हळू लागला. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्याला एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे 16 टाके घालण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


5 वर्षीय चिमुकलीवर घात


नायलॉन मांजाचा फटका घराशेजारी खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला बसला होता. फारुख नगरमधील पाच वर्षीय शबनाज बेगम शाळेतून घरी आली आणि त्यानंतर ती घराशेजारी खेळत होती. बाजूच्या दुसऱ्या इमारतीवर मुले पतंग उडवत होते. दरम्यान एक पतंग कटली. त्या पतंगाचा मांजा पकडण्यसाठी परिसरातील मुलांनी धडपड सुरु केली. एका मुलाच्या हाती मांजा लागल्यानंतर त्याने, तो मांजा ओढण्यास सुरुवात केली. दरम्यान मांजा पीडितेच्या गळ्याला घासून गेल्याने तिच्या गळ्याला खोलवर जखम झाली. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या चिमुकीला आजूबाजूच्या लोकांनी लगेच रुग्णालयात दाखल केले. यात मुलीच्या मानेला 26 टाके घालावे लागले होते. घटनेनंतर पतंग उडवणाऱ्या मुलांनी तिथून पळ काढला होता.


पोलिस आयुक्तांनी केले आवाहन


हायकोर्टाच्या निर्देशावर संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना शहरात कुठेही नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा होत असल्याचे दिसून आले तर 9823300100100 आणि 112 वर कॉल करून पोलिसांना सूचना देण्यात यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.


ही बातमी देखील वाचा...


दररोज कारवाई, लाखोंचा मांजा जप्त, तरीही शहरात पुन्हा नायलॉन मांजा येतो कुठून?