नागपूरः रेल्वेस्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा सहा पदरी मार्गाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामध्ये अडसर ठरत असलेल्या रेल्वे स्थानकासमोरील 175 दुकाने तोडण्याच्या कारवाईला अखेर सोमवारपासून सुरुवात झाली. यामध्ये 116 दुकानदारांना आपली सहमती दर्शविली असून उर्वरित 44 दुकानदार कायदेशीर लढाई लढत आहेत.


सहा पदरी मार्गासाठी रेल्वेस्टेशन समोरील उड्डानपुलाखाली असलेल्या 175 दुकाने तोडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. याविरोधात अनेक दुकानदार कोर्टात गेले होते. त्यानंतर मनपाने दुकानदारांसाठी दोन पर्याय खुले ठेवले. त्यात दुकान लिजवर देतेवेळी जमा करण्यात आलेली अनामत रक्कम 8 टक्के व्याजासह परत देणे किंवा मेट्रो उभारत असलेल्या व्यापारी संकुलात दुकान देणे असे दोन पर्याय उपलब्ध करुन दिले होते. त्यापैकी काही दुकानदारांनी 8 टक्के व्याजासह अनामत रक्कम परत घेण्याचा निर्णय घेतला तर काहींनी पर्यायी दुकानाचा निर्णय घेतला. यापैकी 44 दुकानदार मात्र कोर्टात पोहोचले आहेत.


नागपूर महानगरपालिकेच्यावतीने 2008मध्ये सिताबर्डी रेल्वे स्टेशन समोरील उड्डाण पुलाचे खाली 175 दुकानाचे दुकान संकुल म.न.पा. द्वारा बांधण्यात आले व 'प्रथम येणार प्रथम घेणार' या तत्वावर अग्रीम रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा करून घेवून वर्ष 2008 मध्ये 30 वर्षाकरीता दुकान वापरणेस आवंटीत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2018मध्ये  मनपाच्या सभागृहात उड्डानपुलाऐवजी सहा पदरी रस्ता बांधण्यासाठी उड्डाणपुल व दुकानांचे संकुल तोडण्याचा आणि बाधित होणाऱ्या दुकानदारांना महामेट्रो द्वारा बांधण्यात आलेल्या संकुलात स्थानांतरीत करण्याचे निर्णय घेतला.


35 दुकानदारांनी घेतली नव्हती दखल


या निर्णयानंतर महानगरपालिकेने 160 दुकानदारांना नोटीस पाठविली होती. त्यापैकी 129 दुकानदारांनी नोटीसची दखल घेवून उत्तर सादर केले. दुकानदारांना सुनावणीकरीता बोलाविण्यात आले. 125 दुकानदार सुनावणीकरीता हजर झाले होते. त्यापैकी 47 दुकानदारांनी नुकसान भरपाई स्वरूपात अग्रीम जमा रक्कम व्याजासह परत मागीतली होती. 30 दुकानदारांनी  महामेट्रोनी बांधलेल्या संकुलात जाणेस उच्छुकता दर्शविली. 44 दुकानदारांतर्फे उपस्थित प्रतिनिधींनी सदर ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या दस्ताऐवजची मागणी केली. 4 दुकानदारांनी कारणे दाखवा नोटीसचे उत्तर दाखल केले परंतू सुनावणीमध्ये सहभागी झाले नव्हते. 35 दुकानदारांनी कोणताही दाखल घेतलेली नव्हती.


Defense sector : संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील कौशल्य विकास, नोकरी प्रशिक्षण आता नागपुरात


8 टक्के व्याजासह रक्कम परत


सुनावणीमध्ये नुकसान भरपाईबाबत केलेली मागणी मनपा सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच त्यावर निर्णय घेवून सदर दुकान संकुलातील दुकान अनामत रक्कमेतून वापर शुल्क वजा करता, शिल्लक जमा रक्कम 8% व्याजानी परत करणेचे निर्देश देण्यात आले. जे दुकानदार महामेट्रोनी बांधलेल्या संकुलात जाणेस उच्छुक असतील त्यांना दुकान आवंटीत करणेचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच संपूर्ण 160 दुकानदारांना लेखी माहिती कळवून पर्याय निवडणेची विनंती करण्यात आली. त्यापैकी 44 दुकानदारांनी 8% व्याजानी शिल्लक अग्रीम जमा रक्कम परत घेणेस व दुकानाचा ताबा परत करण्याची संमती 44 दुकानदारांनी दिली. तर 57 दुकानदारांनी महामेट्रोच्या संकुलात पर्यायी दुकान घेण्यसा तयारी दर्शविली. त्यानंतर इश्वर चिठ्ठी पद्धतीने महामेट्रोच्या संकुलातील 57 दुकाने आवंटीत करण्यात आले. यानंतर उड्डाणपुल संकुलातील 57 दुकाने व रिकामे असलेली 15 दुकाने अशी 116 दुकाने रिकामे करून तोडणेची कार्यवाहीला आजपासून सुरुवात करण्यात आली.


Jain Paryushan 2022 : पर्युषण पर्व दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद, 24 ऑगस्टपासून सुरु होतोय पर्व


19 दुकानदार हायकोर्टात तर 25 दुकानदार जिल्हा न्यायालयात


मनपाचे पर्याय अमान्य असलेल्या 19 दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. तर 25 दुकानदारांनी जिल्हा न्यायालयात दाद मागीतली आहे. सदर 44 दुकानदारांकरीता अजूनही महामेट्रोनी बांधलेल्या संकुलातील दुकान स्विकारण्यास किंवा शिल्लक अग्रीम जमा रक्कम 8% नी स्विकारून उड्डाणपुल संकुलातील दुकान खाली करण्यास मनपाद्वारे पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे, हे विशेष.