नागपूर : नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अजनी चौकातील क्लॉक टॉवर पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी कंपनीद्वारे 'क्लॉक टॉवर' सुरू करण्यात यश आले आहे. 2014 पासून बंद असलेली ही घडी सुरू करण्याचे कार्य विक्रमी वेळेत केल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुष्पगुच्छ देउन एचएमटी कंपनीचे अभियंता व्यंकटेश यांचा सत्कार केला व उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, अधिक्षक संजय दहीकर यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.


शुक्रवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी अजनी चौकात क्लॉक टॉवरची पाहणी केली. यावेळी उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, एचएमटी कंपनीचे अभियंता व्यंकटेश, सहायक अधीक्षक संजय दहिकर आदी उपस्थित होते. अजनी चौकातील मध्यवर्ती कारागृहाकडून प्राप्त जागेवर 2012 या वर्षी मनपाद्वारे क्लॉक टॉवर उभारण्यात आले. यासाठी अंदाजे 40 लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. 21 मीटर पॅराबोलिक स्टेनलेस स्टील स्ट्रक्चर वर 2 मीटर उंचीची प्रिझम शेप सॅटेलाईट वॉच लावण्यात आली होती. या घडी व परिसराचे सभोवतालाच्या सौंदर्यीकरणाची देखभाल व दुरूस्तीकरिता दरबार वॉच यांचेद्वारे वार्षिक खर्च 36 लक्ष रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या मोबदल्यात संबंधित कंपनीला मनपा क्षेत्रात पाच गॅन्ट्री उभारून 10 वर्षाकरिता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याची मागणी होती. तत्कालीन स्थायी समितीद्वारे पाच गॅन्ट्री उभारून तीन वर्षाकरिता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरवार वॉच कंपनीद्वारे 10 वर्षाकरिता जाहिरात देण्याचीच मागणी करण्यात आली. यावर एप्रिल 2022 मध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुढाकार घेत या घडीसंदर्भात इतर एजन्सी शोधण्याचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांना निर्देश दिले.


1 लाख 652 रुपयांचा खर्च


मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) व्दारे भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी लि. कंपनीशी संपर्क साधण्यात आला. कंपनीचे अभियंता व्यंकटेश यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षण केले. क्लॉक टॉवर दुरूस्तीसाठी कंपनीद्वारे 1 लक्ष 72 हजार 652 रुपये खर्च प्रस्तावित असल्याचे कळविण्यात आले. यास मनपा आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या टी.टी.एल व कारखाना विभागाव्दारे पुरविण्यात आलेल्या टेलिस्कोपिक क्रेनचा वापर करून 13 ते 21 जुलै या कालावधीत सतत 9 दिवसरात्र कार्य करून 8 वर्षापासून बंद असलेली घडी सुरू करण्यात यश आले आहे.
 
आता निशुल्क सेवा पुरवठादाराचा शोध सुरु


याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात ही घडी सुरू केल्याबद्दल एचएमटी चे अभियंता व्यंकटेश यांचे विशेष अभिनंदन केले. नागपूर शहराची शान वाढविणारे हे 'क्लॉक टॉवर' असल्याचे नमूद करीत त्यांनी या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. क्लॉक टॉवरच्या खाली कारंजे लावण्यात येणार असून सभोवताल रेलिंग करण्यात येणार आहे. या भागात नागरिकांना बसण्यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे, यादृष्टीने कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी प्रशासनाला निर्देश दिले. देशात कुठेच या स्वरूपात 'क्लॉक टॉवर' नसून अथक प्रयत्नांनी सुरू झालेली घडी पुन्हा बंद होउ नये यादृष्टीने प्रणाली विकसीत करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. या घडीचे संपूर्ण व्यवस्थापन नि:शुल्करित्या होईल याबाबत इच्छुक संस्थेसोबत बोलणी सुरु असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. 


दररोज 12 वाजता जीपीएस सिग्नल


एचएमटी लि.चे अभियंता व्यंकटेश यांनी घडीच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. घडीचे सॉफ्टवेअर सॅलेटाईट बेस असून सकाळी 12 आणि रात्री 12 या दोन वेळेत घडीला जीपीएस सिग्नल प्राप्त होतो. त्यानुसार घडीचे वेळ निश्चित होत असते. देशात कुठेच या स्वरूपाची घडी नसल्यामुळे याबद्दल काम करणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. पिरॅमिड आकारातील एचएमटी चे हे देशातील एकमेव मॉडेल असून ही यूनिक घड्याळ असल्याचेही व्यंकटेश यांनी नमूद केले.


Plastic Ban : 50 हजारांचा दंड वसूल, 23 किलो प्लास्टिक जप्त