नागपूरः कोरोनाची बाधा झाल्यानंतर अस्वस्थ रुग्णांवर रुग्णालयात भरती करण्याची वेळ येत असून सध्या 66 बाधितांवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात 219 नव्या बाधितांची नोंद झाली. यात शहरातील (Nagpur covid) 155 आणि ग्रामीणमधील 64 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 188 बाधितांनी कोरोनावर मात (covid update) केली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीने 1417चा टप्पा पार केला असून भविष्यात चाचण्या वाढविल्यास दररोज हजार बाधितही समोर येऊ शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आज 2644 जणांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करण्यात आली. तर 490 जणांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. सध्या एकूण बाधितांपैकी 1351 बाधित गृहविलगीकरणात आहेत.


66 अस्वस्थ बाधित रुग्णालयात


जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह रुग्णालयात भरती होणाऱ्या बाधितांच्या संख्येचा आलेखही झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार 66 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधितांपैकी 14 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, 5 बाधित मेयोमध्ये, 10 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित लतामंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे, 3 बाधित क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित Aureus हॉस्पिटलमध्ये, 4 बाधित एम्समध्ये, 2 बाधित सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित दंदे हॉस्पिटलमध्ये, 9 बाधित विवेका हॉस्पिटलमध्ये, क्रिम्स हॉस्पिटलमध्ये 1, कल्पवृक्ष हॉस्पिटलमध्ये 1, डॉ. गायकवाड हॉस्पिटलमध्ये 1 आणि 2 बाधितांवर मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


बुस्टर डोससाठी पात्रता


कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.