Nagpur News: स्वतःची ओळख सोशल मीडिया आणि सायबर तज्ज्ञ म्हणून निर्माण करुन अनेकांची फसवणूक करणाऱ्या अजित पारसेचा (Ajit Parse) पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. त्याचे मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कुंडली काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी (Nagpur Police) सुरु केली आहे. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणारे सगळेच पोलिसांच्या 'रडार'वर आले असल्याची माहिती आहे.
अजित पारसे यांने अनेक नेत्यांसोबतचे छायाचित्र आणि माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे तयार केलेल्या प्रतिमेचा फायदा घेत अनेकांची कोट्यावधीचे फसवणूक केली आहे. त्याने फसवणूक करणाऱ्यांचा आकडा दररोज वाढताना दिसत आहे. मोठ्या नेत्यांसोबत आपले उठणे-बसणे आहे, अशी बतावणी करुन त्याने अनेकांना कोट्यावधी रुपयांनी गंडवल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने ही मोठी रक्कम कुठे गुंतवली आहे त्याचा पोलिस कसोशीने शोध घेत आहे.
बातम्यांमुळे अनेक तक्रारदार समोर
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करणाऱ्या पथकाला बऱ्यापैकी यश मिळाले असून लवकरच पारसेशी निगडीत व्यक्तींनाही पोलिस तपासासाठी बोलवू शकतात अशी माहिती आहे. फसवणुकीतून मिळालेली रक्कम पारसेने मोठ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवल्याची शंका पोलिसांना आहे. पारसेची चार-पाच वर्षांपूर्वीची प्रकरणंही सध्या पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती आहे. अजित पारसे विरुद्ध कारवाई सुरु झाल्याने अनेक फसवणूक झालेले नागरिक समोर येत आहे. तसेच आणखी कोणाची फसवणूक अजित पारसे याने केली असल्यास नागरिकांनी समोर यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लिखित तक्रार कराः पोलिस
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पारसेला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्याची माहिती आहे. घरीच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तपास पथकाने गुरुवारी त्याच्या घराची झडती घेऊन सात मोबाईल, 3 लॅपटॉप, संगणक आणि 4 हार्डडिस्क जप्त केल्या होत्या. या उपकरणांची सायबर सेलने तपासणी सुरु केली आहे. यासोबतच अनेक तक्रारकर्ते तपास पथकाला भेटत आहे. यावर पोलिसांकडून तक्रारकर्त्यांना लिखित तक्रार करण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात येत आहे.
महिलांनी पुढे यावे...
अजित पारसे याने अनेक उच्चभ्रू महिलांशी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या महिलांना न घाबरता समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये तक्रारदार महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी हमी पोलिस देत आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी...
- अजित पारसे विरुद्धची पहिली तक्रार महाल येथील डॉ. मुरकुटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर सर्व प्रकरण समोर आले होते.
- गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पारसेच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. सोबतच त्याच्या महागड्या दुचाकीसह नऊ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या.
- रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस घरी धडकल्यापासून पारसेने आपल्या हातावर चाकूने कापण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती आहे.
- पारसेच्या सहा बँक खात्याचे पासबुक पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याचे लॉकरही सील करण्यात आले असून लवकरच लॉकरची तपासणी करण्यात येणार आहे.
- पारसेविरुद्ध तक्रार करण्यासाठी 20 पेक्षा अधिक डॉक्टर आणि व्यावसायिक पोलिसांना भेटले असून, पोलिस त्यांच्या लेखी तक्रारींची वाट पाहत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या