Nagpur News : नागपूरमधून थेट चंद्रपुरात सापडलेल्या एका मुलीने आपले अपहरण केल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही गोष्ट बनाव असल्याचे समोर आले. अभ्यास न केल्याने आई रागवल्याने एका 14 वर्षीय मुलीने घर सोडून चंद्रपूर गाठले. मात्र, पुढे काय करावे हे न सुचल्याने या मुलीने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपले अपहरण झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात या मुलीने स्वतःच घर सोडल्याचे समोर आले. 


नागपूर येथील नंदनवन (Nandanvan) परिसरात राहणारी 14 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी घरातून निघाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती कुठेच न सापडल्याने कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, ही मुलगी थेट चंद्रपूरमध्ये सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ही अल्पवयीन मुलगी चंद्रपूर पोहोचल्यावर रामनगर ठाण्यात जाऊन दोन महिलांनी कारमधून आपले अपहरण केल्याचे पोलिसांना सांगितले. मोठ्या प्रयत्नांनंतर आपण महिलांच्या तावडीतून बचावलो असल्याची माहिती तिने चंद्रपूर पोलिसांना दिली. 


स्वत: रचली अपहरणाची गोष्ट


पोलिसांनी केलेल्या तपासात ही अल्पवयीन मुलगी खोटं बोलत असल्याचे समोर आले. या अल्पवयीन मुलीने आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तिने दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये ही मुलगी खोटं बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली. त्यामध्ये तिने आई अभ्यासासाठी रागवल्याने घरातून पळून आल्याचे सांगितले. नागपूरमधील घरातून निघून चंद्रपूरला आल्यानंतर पुढे काय करावे हे सुचले नाही. त्यामुळे तिने चंद्रपूर पोलीस गाठले आणि पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी नागपुरात तिच्या आईवडिलांशी संपर्क साधून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.


रागाच्या भरातून घर सोडून गेल्यानंतर या अल्पवयीन मुलीने चंद्रपूर गाठले. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि: श्वास सोडला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: