वाडी भागातील सुरक्षानगर परिसरात राहणाऱ्या 73 वर्षीय शंकर चंपाती आणि 65 वर्षीय सीमा चंपाती या दाम्पत्याची रविवारी (14 एप्रिल) हत्या झाली होती. राहत्या घरी वेगळवेगळ्या खोल्यांमध्ये त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले होते. या दुहेरी हत्येप्रकरणी चंपाती यांची 23 वर्षीय मुलगी प्रियांका आणि तिचा 23 वर्षीय प्रियकर मोहम्मद इकलाक खान या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांचा आणखी एक मित्र फरार आहे.
कमी शिक्षित, इतर धर्मीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या उच्चशिक्षित मुलीवर वडिलांचा राग आणि अनेक वर्ष सांभाळ करणाऱ्या पालकांपेक्षा प्रियकरच जास्त प्रिय अशा बाप-लेकीच्या विचारद्वंदातून हे हत्याकांड घडल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे.
नागपुरातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचं कोडं उलगडलं, मुलगी आणि बॉयफ्रेण्ड अटकेत
रविवारी सकाळी आई-वडिलांसोबत नाश्ता केल्यानंतर दिवसभर घराबाहेर राहिलेली प्रियांका संध्याकाळी सव्वाआठच्या सुमारास घरी परतली. घरी पोहोचताच अज्ञात गुन्हेगारांनी आपल्या आई-वडिलांची हत्या करुन चोरी केल्याचा कांगावा तिने केला. एका चांगल्या वस्तीत राहत्या घरी ज्येष्ठ दाम्पत्याच्या या हत्येच्या प्रकरणाला पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत तपासाची चक्रे फिरवली.
आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या शंकर आणि सीमा यांच्या घरातून हत्याकांडानंतर फक्त नऊ हजार रुपयांची लूट झाल्यामुळे पोलिसांना या घटनेमागे वेगळंच कारण असल्याचा संशय आला होता. हत्या झाल्याचं सर्वात आधी पाहणाऱ्या आणि वारंवार जबाब बदलणाऱ्या प्रियांकाच्या वर्तनावर पोलिसांना संशय होताच. तिला वेगवेगळ्या पद्धतीने विचारणा केल्यावर अखेरीस प्रियांकाने सत्य पोलिसांसमोर कबूल केलं.
प्रियांका अवघ्या सहा महिन्यांची असताना चंपाती दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं होतं. दुसरं अपत्य नसल्याने दोघांनी तिला पोटच्या मुलीप्रमाणेच वाढवलं, उच्चशिक्षण दिलं. सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही नारळपाण्याचा व्यवसाय करत शंकर चंपाची यांनी प्रियांकाला कम्प्युटर इंजिनिअर बनवलं होतं. मात्र, इंजिनिअर होऊन चांगल्या आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत प्रियांका फक्त बारावी पास आलेल्या इकलाकच्या प्रेमात पडली आणि तिथेच वडील आणि मुलीच्या संबंधात दुरावा निर्माण झाला.
नागपुरात वृद्ध दाम्पत्याची हत्या, चोरीच्या उद्देशाने हत्येचा संशय
मुलीच्या अशा वर्तनामुळे आणि निर्णयांमुळे व्यथित झालेले शंकर तिच्यावर नाराज होते. तिला कठोर शब्दात बोलू लागले आणि हेच प्रियांकाला पटलं नाही. तिने अखलाकच्या मदतीने आई-वडिलांची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी सकाळी तिने नाश्ता बनवत आई-वडिलांना खाऊ घातला. तसंच फळांमध्ये बेशुद्धीचं औषध मिसळून खायला दिलं. त्यानंतर इकलाकला घरी बोलावलं. वृद्ध शंकर आणि सीमा चंपाती गुंगीत असताना अखलाकने त्यांची हत्या केली.
कम्प्युटर इंजिनिअर असल्याने प्रियाकांने पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतःचं आणि इकलाकचं फेसबुक अकाऊंट, व्हॉट्सअॅप मेसेज, जीमेल अकाऊंट डिलीट केलं. हत्याकांडानंतर हे सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याने आपण सुरक्षित राहू आणि पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असा दोघांचा विश्वास होता. मात्र, पोलिसांनी दोघांच्या वर्तनावरुन त्यांचं पाप हेरलं आणि सत्या अवघ्या 48 तासात जगासमोर आलं.
VIDEO | मुलीकडूनच आई-वडिलांची हत्या | नागपूर