नागपूर:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात मोठी बातमी आहे. हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाच्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण दिसतं त्यापेक्षा अधिक गंभीर आहे, असं सूत्रांनी सांगितलं. जयेशला बेळगावहून ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिक तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम पुन्हा बेळगावला जाणार आहे. 


नितीन गडकरी यांच्य कार्यालयात धमकीचे फोन करणारा आरोपी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. हत्येच्या दोन प्रकरणांमुळं जयेश पुजारीला जन्मठेप मिळाली होती.  बेळगाव तुरुंगत तो शिक्षा भोगत होता.  जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती. पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झालीय. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली, असे पुजारीने सांगितले होते. मात्र  पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नव्हते आता पुढील चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे जाण्याची शक्यता आहे.


मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचा ताबा नागपूर पोलिसांना (Nagpur Police)  28 मार्चला  मिळाला. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. ही टीम आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतली. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीत आरोपी जयेश पुजारीने काही खुलासे केले आहेत.   


धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ


जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.