नागपूर : राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं आशिष देशमुख म्हणाले. काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार असला तरी काँग्रेसमध्ये राहून पक्षाचं काम करणार असल्याचं देशमुख यांनी नमूद केलं.


महाराष्ट्रात राज्यसभेसाठी अनेक सक्षम नेते असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खदखद वाढली आहे. बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा काँग्रेस प्रदेश महासचिव आशिष देशमुख देणार आहेत. भाजप सोडून, आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आशिष देशमुख यांना राज्यसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु ते पाळलं गेलं नाही, असा दावा आशिष देशमुख यांनी केला.


इम्रान प्रतापगढी जे स्वतः कव्वाल, शायर आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या पक्षाच्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा, असा खोचक सल्लाही आशिष देशमुख यांनी दिला. आपण महासचिव पदाचा राजीनामा देणार असला तरी पक्ष सोडणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं.


राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी


राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले असून महाराष्ट्रातून कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


कोण आहेत इम्रान प्रतापगढी?



  •  उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय मुस्लिम तरुण चेहरा 

  • उर्दू कवी अशीही ओळख 

  • कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष

  • कॉंग्रेसमधील राहुल गांधी यांच्या तरुण फळीतील विश्वासू सहकारी

  • उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्याबरोबर प्रचार केला