मुंबई : कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी (Congress RajyaSabha) दहा जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेसने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
राज्यसभेकरता तरुणांना संधी देण्याचा कॉंग्रेसचा मानस आहे. उदयपूर चिंतन शिबिरात देखील तरूणांना संधी देण्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. इम्रान प्रतापगडींसोबत कन्हैय्या कुमार, बी.व्ही श्रीनिवास यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, कॉंग्रेसच्या गोटातून इम्रान प्रतापगडींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कोण आहेत इम्रान प्रतापगडी?
- उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय मुस्लिम तरुण चेहरा
- उर्दू कवी अशीही ओळख
- कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष
- कॉंग्रेसमधील राहुल गांधी यांच्या तरुण फळीतील विश्वासू सहकारी
- उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्याबरोबर प्रचार केला
तामिळनाडूतून पी. चिदंबरम यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. रणदीप सुरजेवाला,मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर कर्नाटकातून जयराम रमेश यांना राज्यसभेचे तिकिट दिले आहे. छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, रणजीत रंजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातून अजय माकेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या 'या' नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे
पी चिदंबरम
जयराम रमेश
अंबिका सोनी
छाया वर्मा
प्रदीप टमटा
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार तर भाजपकडून पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या :
भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, राज्यातून पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना संधी